पुणे | लोकांच्या गरजा ओळखून कामास प्राधान्य

कोथरूड, {प्रभात वृत्तसेवा} – सार्वजनिक जीवनात काम करताना, सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा ओळखून उपक्रम राबविण्याला माझे प्राधान्य असते. त्यातूनच आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धा ही समाजाच्या एकत्रीकरणासाठी राबविण्यात आल्याचे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नवोदित आणि हौशी कलाकारांसाठी पाटील यांच्या संकल्पनेतून आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, भाजपा कोथरूड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, सरचिटणीस पुनीत जोशी, मधुरा आणि आशुतोष वैशंपायन, स्पर्धेचे परीक्षक भालचंद्र करंदीकर, अनुराधा राजहंस, माधव जोगळेकर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींनी एकत्रित येऊन आपला आनंद साजरा करावा असे मला वाटते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही सुप्तगुण दडलेले असतात. त्यांना व्यासपीठ मिळणे आवश्यक असते.
आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून अशा सुप्तगुण दडलेल्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता.
त्याला हौशी कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, की आजच्या आधुनिक युगात लोक तंत्रज्ञानात अडकले असून, हौशी कलाकार त्यामध्ये गुरफटून गेला अहे.
मात्र, अशा स्पर्धांमुळे हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळण्यासोबतच त्यांचे एकत्रीकरण होऊन विचारांची देवाणघेवाण होते. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.
या स्पर्धेत कोथरूडमधील आयडियल कॉलनीने सादर केलेल्या शापित कुंकू एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले, तर द्वितीय पारितोषिक द जर्नी – युथिका सोसायटी, सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय पारितोषिक एक दिवस असाही – सृष्टी सोसायटी आणि गाव पावनं – बळवंतपुरम साम्राज्य सोसायटी यांना विभागून देण्यात आले. प्रास्ताविक मधुरा वैशंपायन, तर सूत्रसंचालन दिग्विजय जोशी यांनी केले.





