आज ४ डिसेंबर, भारतीय नौदल दिन! हा दिवस भारताच्या समुद्री सामर्थ्याचा गौरव करणारा आहे. पण तुम्हाला, भारतीय नौदल दिन नेमका ४ डिसेंबरलाच का साजरा केला जातो? हे माहिती आहे का?
चला जाणून घेऊयात…
४ डिसेंबर १९७१ ही भारताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक रात्र! डिसेंबर १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध शिगेला पोहोचलं होतं. त्याच वेळी, भारतीय नौदलानं एक धाडसी योजना आखली – या योजनेचं नाव होत – ऑपरेशन ट्रायडंट.ऑपरेशन ट्रायडंटच्या निशाण्यावर होत पाकिस्तानच्या व्यापाराचं आणि नौदलाचं प्रमुख केंद्र असलेलं कराची बंदर! हे बंदर त्यांच्या इंधन पुरवठ्याचं मुख्य ठिकाण तर होतंचं यासोबतच पाकिस्तानला युद्धासाठीच्या दारूगोळ्याचा पुरवठा देखील याच बंदरावर होत होता. त्यामुळे हे बंदर उद्ध्वस्त केलं, तर पाकिस्तान आपोआप युद्धात कमकुवत होईल, हे भारताने ओळखलं.
ऑपरेशन ‘ट्रायडंट’मध्ये, भारतीय नौदलानं तीन युद्ध नौकांचा वापर करण्याचा निर्णय घेतला – मिसाईल सज्ज असलेल्या INS निर्घाट, INS निपात, आणि INS वीर यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली.ऑपरेशन ट्रायडंटमध्ये बॅक अप म्हणून ‘INS किल्टन’ला तैनात करण्यात आलं होत. ३ डिसेंबरच्या रात्री, ऑपरेशन ट्रायडंटसाठी प्रस्थान करण्यात आलं. ४ डिसेंबरच्या मध्यरात्री, त्यांनी कराची बंदर गाठलं. परिस्थितीचा अंदाज घेत, भारताच्या वॉर शिप्सने मिसाईल हल्ल्यांसाठी योग्य पोझिशन घेतली. पहिलं लक्ष्य होतं, पाकिस्तानी नौदलाची अत्याधुनिक युद्ध नौका खैबर! INS निर्घाटनं पहिली मिसाईल डागली आणि ‘खैबर’ला समुद्राच्या तळाशी पाठवलं. त्यानंतर, आयएनएस निपातने पाकिस्तानी युद्ध नौका शाहजहानवर हल्ला केला. शाहजहान युद्ध नौका देखील पाताळलोकी पोहोचली.
भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान पुरता हादरून गेला. आयएनएस वीरने कराचीच्या इंधन डिपोवर हल्ला चढवला. यामध्ये बंदरावर असलेला दारुगोळा तसेच इंधन जळून खाक झाले.भारतीय नौदलाच्या ‘ऑपरेशन ट्रायडंट’चा गौरव म्हणून ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो!देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाचा आपल्या सर्वांनाच सार्थ अभिमान आहे!!