Syed Mushtaq Ali Trophy 2024 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आता गुरुवारी खेळल्या गेलेल्या बडोदा विरुद्ध सिक्कीम सामन्यात इतिहास रचला गेला आहे, ज्यामध्ये क्रुणालच्या नेतृत्वाखाली बडोद्याने 263 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
वास्तविक, गुरुवारी इंदोरमध्ये सिक्कीम विरुद्ध (Baroda vs Sikkim) खेळलेल्या टी 20 सामन्यात फक्त 5 विकेट्स गमावून बडोदा संघाने 349 धावा करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 20 षटकामध्ये 349 धावा हा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर आहे. यापूर्वी जगात कोणत्याही संघाने टी20 मध्ये एवढ्या धावा केल्या नव्हत्या. यापूर्वी टी 20 मध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड हा झिम्बाब्वेच्या नावावर होता. त्यांनी याचवर्षी ऑक्टोबरमध्ये गाम्बियाच्या विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 344 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम बडोदा संघाच्या नावावर नोंदवला गेला आहे. तसेच बडोद्याच्या फलंदाजांनी त्यांच्या डावात 37 गगनचुंबी षटकार ठोकले, हा देखील एक विश्वविक्रम आहे.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठी धावसंख्या….
बडोदा 349/5 विरुद्ध सिक्किम – 2024
झिम्बाब्वे 344/4 विरुद्ध गाम्बिया – 2024
नेपाल 314/3 विरुद्ध मंगोलिया – 2023
भारत 297/6 विरुद्ध बांग्लादेश – 2024
कृणाल पंड्याच्या नेतृत्वात बडोदा संघ खेळत आहे. या सामन्यात बडोद्याने प्रथम खेळताना 349 धावा केल्या. शास्वत रावत आणि अभिमन्यू सिंग यांनी मिळून संघाची धावसंख्या अवघ्या 5 षटकांत 92 धावांपर्यंत नेल्याने डावाची सुरुवातच वादळी झाली. शाश्वत रावतने 43 धावा तर अभिमन्यू सिंह राजपूत याने 53 धावा केल्या. यानंतर तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी आलेल्या भानू पानियाचे (Bhanu Pania) मैदानावर वादळ पहायला मिळाले. त्याने 262.75 स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने फक्त 51 चेंडूमध्ये नाबाद 134 धावा केल्या. त्याने यादरम्यान 15 षटकार आणि 5 चौकार लगावले. त्याच्याशिवाय विष्णू सोलंकीनेही तुफानी खेळी खेळली आणि 16 चेंडूत 50 धावा केल्या. लंदाज शिवालिक शर्माने 55 धावा लगावल्या.
Record Alert 🚨
349 runs 😮, 37 sixes 🔥
Baroda have rewritten the history books in Indore! They smashed 349/5 against Sikkim, the highest total in T20 history, & set a new record for most sixes in an innings – 37 👏#SMAT | @IDFCFIRSTBank
Scorecard: https://t.co/otTAP0gZsD pic.twitter.com/ec1HL5kNOF
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 5, 2024
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये यापूर्वीची सर्वोच्च सांघिक धावसंख्या पंजाबने केली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासात 300 हून अधिक धावांची ही पहिलीच धावसंख्या होती. याआधी या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या पंजाबने गेल्या हंगामात म्हणजेच 2023 मध्ये केली होती. आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात पंजाबने 20 षटकांत 6 बाद 275 धावा केल्या होत्या.
सर्वाधिक षटकारांचा विक्रम देखील मोडित…
आतापर्यंत टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर होता. त्यांनी गाम्बियाविरूध्द 344 धावसंख्या उभारताना एका डावात 26 षटकार लगावले होते. मात्र बडोदा संघाने 37 षटकार मारून हा विक्रमही मोडीत काढला आहे. धावांच्या फरकाने भारतीय क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2019 मध्ये आंध्र प्रदेशने नागालँडचा 179 धावांनी पराभव केला होता. भारतीय क्रिकेटमधील कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. भारताच्या राष्ट्रीय संघाने 297 धावसंख्या गाठली आहे. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे, ज्यांनी आयपीएल 2024 मध्ये आरसीबीविरुद्ध 287 धावा केल्या होत्या. याशिवाय टी-20 सामन्याच्या एका डावात चौकार (षटकार आणि चौकार) च्या मदतीने सर्वाधिक 294 धावा करण्याचा विक्रमही नोंदवला गेला.
सिक्कीम पूर्णपणे ठरले अपयशी…
सिक्कीम संघ 350 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा 49 धावा होईपर्यंत निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. बडोद्याचे गोलंदाज सुरुवातीपासूनच विरोधी फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसत होते. सिक्कीम संघाला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 86 धावा करता आल्या आणि सामना 263 धावांनी गमवावा लागला. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा पराभव आहे.