कोहिमा – नागालॅंड विधानसभा निवडणूकीत एक नवीन इतिहास रचला गेला आहे. या राज्यातून प्रथमच एक महिला उमेदवार विजयी झाली असून हेकानी जाखलू असे या विजयी झालेल्या महिला उमेदवाराचे नाव आहे.
नागालॅंडमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक निकाल लागला आहे. या राज्यातील एका विधानसभा मतदारसंघामधून पहिल्यांदाच एक महिला उमेदवार विजयी झाली आहे. तब्बल 60 वर्षानंतर एक महिला उमेदवार विजयी झाल्याने हा ऐतिहासिक निकाल लागला असल्याचे बोलले जात आहे.
व्यवसायाने वकील असलेल्या हेकानी जाखलू यांनी दिमापूर-3 या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी याठिकाणाहून 1 हजार 536 मतांनी विजय मिळविला आहे. लोकजनशक्तीचे उमदेवार एजेतो झिमोमी यांचा हेकानी यांनी पराभव केला.
नागालॅंड येथे आतापर्यंत 14 वेळा विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. पण याआधी कधीही कोणतीही महिला विजयी झालेली नाही. यंदाच्या निवडणुकांमध्ये हेकानी जखालू यांच्यासोबत एनडीपीपीच्या सलहौतुओनुओ क्रूस, कॉंग्रेसच्या रोजी थॉम्पसन आणि भाजपच्या काहुल सेमाही या महिला सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. परंतु, हेकानी यांनी विजयी होऊन नागालॅंडमध्ये पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळविला आहे.