‘त्यांची’ राखीपौर्णिमा झाली 90 वर्षांची!

अभिराज भडकवाड
औंध – वय कितीही झाले, तरी बहीण-भावाचे प्रेम हे निराळेच असते. याचा प्रत्यय बुधवारी साजऱ्या झालेल्या राखी पौर्णिमेच्या दिवशी आला. वयाची नव्वदी पार केलेले दोघे भाऊ आणि 91 वर्षांची त्यांची बहीण… असा अनोखा सण अनुभवता आला. या तिघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
बालेवाडी येथील प्रगतशील शेतकरी दिगंबर बालवडकर, वय 93 आणि बाजीराव बालवडकर, वय 95 या दोघा भावांनी आपली बहीण बाई विठोबा भोंडवे रा. रावेत, वय-91 यांच्या हस्ते राखी बांधून घेतली. तब्बल नऊ दशकांची ही सोबत भाऊ-बहिणीचे नाते जपणाऱ्या भेटीचा दुर्मीळ क्षण मुलांनी आणि नातवांनी अनुभवला.
हे दोघे भाऊ आणि बहीण दरवर्षी राखी पौर्णिमेला आवर्जून एकत्र येतात. पण, यंदा प्रकृतीच्या कारणामुळे बहीण बाई भोंडवे यांना येता येणार नसल्याचे बालवडकर बंधूंना समजले. त्यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत बहिणीच्या घरी अचानक भेट दिली. रक्षाबंधनाच्या दिवशी आपले ज्येष्ठ बंधू आपल्या भेटीला येतील, याची अपेक्षा या बहिणीला नव्हती. अचानक दोन्ही भाऊ आल्यामुळे त्यांनीही आनंद व्यक्त केला.
दोन्ही भावांच्या हातावर राखी बांधताना अनमोल नात्यांची संपत्ती जवळ असल्याचा आनंद यावेळी बाई भोंडवे यांच्यास चेहऱ्यावर पाहायला मिळाला. यावेळी उपस्थित नातेवाईकदेखील भारावलेले दिसले. वयाची नव्वदी पार केलेल्या भावा-बहिणींना मुले, सुना, नातवंडे, पंतवंडेदेखील आहेत. अशावेळी मुलांच्या मदतीने अचानक घडवून आणलेली ही भेट महत्त्वाची आणि दुर्मीळ ठरली आहे.





