Hinjawadi Murder Case: बहिणीचा खून करणाऱ्या भावाला जन्मठेप! हिंजवडीतील ‘त्या’ थरारक हत्याकांडाचा निकाल
Hinjawadi Murder Case: हिंजवडी पोलिसांचा शास्त्रोक्त तपास अन् 'स्टार केस' म्हणून पाठपुरावा; तब्बल १६ वर्षांनंतर न्यायालयाने आरोपी सुबोजित बासूला सुनावली जन्मठेप.

Hinjawadi Murder Case – व्यवसायातील नुकसानामुळे निराश होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावाला विरोध केल्याने बहिणीचा गळा दाबून खून केला. या गुन्ह्यातील आरोपी भावाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुबोजित बासू असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तब्बल १६ वर्षांपूर्वी घडलेल्या या खूनप्रकरणात हिंजवडी पोलिसांनी केलेल्या शास्त्रोक्त तपासामुळे आरोपीला शिक्षा झाली.
ही घटना १४ एप्रिल २०१० रोजी पहाटे शिंदेनगर येथील अपराजिता सोसायटीत घडली होती. सुबोजित बासू हा व्यवसायात नुकसान झाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी त्याची बहीण प्रियदर्शिनी बासू (वय २३) हिने त्याला विरोध केला. त्याचा राग आल्याने आरोपीने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. एस. वंजारी यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली. तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर. टी. पवार यांनी घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाची ‘स्टार केस’ म्हणून निवड करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिसांनी न्यायालयीन कामकाजाचा सातत्याने पाठपुरावा केला. सरकारी अभियोक्ता लिना पाठक यांनी न्यायालयात सरकारची बाजू मांडली. साक्षीदारांची उपस्थिती, सी. ए. अहवाल, मुद्देमाल आणि न्यायालयीन प्रक्रियेचा प्रभावी पाठपुरावा पोलिसांनी केला. उपलब्ध पुरावे आणि साक्षी विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी सुबोजित बासू याला भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.





