यूपी, बिहार आणि आंध्रात सर्वाधिक बाल तस्करी; गेल्या पाच वर्षांत तब्बल ‘इतके’ टक्के वाढ !

नवी दिल्ली – वर्ष 2016 ते 2022 या कालावधीत उत्तर प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून सर्वाधिक मुलांची तस्करी झाल्याचे उघड झाले आहे. तर कोविड-19 पूर्वीच्या टप्प्यापेक्षा महामारीनंतरच्या टप्प्यात दिल्लीत मुलांची तस्करी जास्त आहे.
या प्रकरणांमध्ये गेल्या पाच वर्षांत 68 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या नव्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.
“चाइल्ड ट्रॅफिकिंग इन इंडिया : इनसाइट फ्रॉम सिच्युएशनल डेटा ऍनालिसिस अँड नीड फॉर टेक-ड्राइव्हन इंटरव्हेंशन स्ट्रॅटेजी’ या सर्वसमावेशक अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.
हा अहवाल “गेम्स 24×7′ आणि कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशनचे संस्थापक, शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळवलेले कैलाश सत्यार्थी आहेत.
हा अहवाल रविवारी “जागतिक मानवी तस्करी प्रतिबंध दिना’च्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये देशातील बाल तस्करीच्या चिंताजनक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेश ही शीर्ष तीन राज्ये आहेत.
जिथे 2016 ते 2022 दरम्यान सर्वाधिक मुलांची तस्करी झाली. अहवालानुसार, जिल्हानिहाय मुलांच्या तस्करीच्या बाबतीत जयपूर शहर अव्वल स्थानावर आहे. तर यादीतील इतर चार स्थानांमध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीचा समावेश आहे.





