Kolhapur : कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ; १८ ऑगस्टपासून कामकाज सुरू

Kolhapur – मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून येत्या 18 ऑगस्टपासून खंडपीठाचं काम सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे कामकाज सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून अधिकृतपणे सुरू होईल.
या खंडपीठाच्या कार्यकक्षेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे चालवली जातील. सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यकतेनुसार न्यायाधीश आणि कर्मचारी वर्ग येथे कार्यरत असेल. कामकाजाच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यात आली असल्याचेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही मागणी अनेक वर्षांपासून होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार होता. परंतु याचा निर्णय होत नव्हता. त्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली.





