“हेरिटेज वॉक’ला उपेक्षेची घरघर

हेरिटेज वॉकची स्थळे
राजवाडा, फाशीचा वड, चार भिंती, प्रतापसिंह हायस्कूल, मंगळवार तळे, मोती तळे, महादरे तलाव, पोलीस मुख्यालय इमारत, अदालत वाडा, पंचपाळी हौद, अजिंक्यतारा किल्ला, खापरी नळ योजना.
सातारा – जागतिक वारसा सप्ताहाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. वारसास्थळांच्या संवर्धनासाठी जनजागृती, ही या सप्ताहाची मूळ संकल्पना असताना दुर्दैवाने या सप्ताहात एकही कार्यक्रम साताऱ्यात सुरू झालेला नाही. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक शाहूनगरीतील अनेक शतकोत्तर वास्तू शेवटच्या घटका मोजत आहेत. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.
सातारा शहरात पर्यटनाला कुठे जावे, हे सांगताना अडखळल्यासारखे होते. शहराच्या मध्यवर्ती भागात ऐतिहासिक राजवाडा, कमानी हौद, सबर्बन कॅन्टोन्मेंट, महादरे, मंगळवार तळे, पंचपाळी हौद, चार भिंती अशा अनेक वास्तूंना लागलेली उपेक्षेची घरघर हेरिटेज सप्ताहाच्या निमित्ताने ठळक झाली आहे. जिज्ञासा मंचची साताऱ्याचा ऐतिहासिक वारसा उजेडात आणण्याची एक धडपड आहे. हेरिटेज वॉकसारखे उपक्रम गेल्या दोन वर्षात त्यांनी राबवले. मात्र, दुर्दैवाने सातारा पालिकेने यामध्ये कधीच पुढाकार घेतला नाही. सातारा शहराचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन अवशेष व पुरातन पाऊलखुणांची ओळख करून देण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. मात्र, या प्रयत्नांना बळ मिळवण्यासाठी यातायात करावी लागत आहे. सातारा पालिका या चाकोरीबाह्य उपक्रमात सहभागी होत
नाही.
जिज्ञासा मंचने साताऱ्यातील ऐतिहासिक ठिकाणे व वास्तू पर्यटकांना दाखवून त्यांचे पुरातन संदर्भ सांगण्याचा स्त्युत्य प्रयत्न केला. जनजागृती, ही यंदाच्या हेरिटेज सप्ताहाची मूळ संकल्पना असताना, ते सोडाच, पण हेरिटेज वॉक, संवर्धनाची जवाबदारीची जाणीवही सोडून देण्यात आली आहे. हेरिटेज वॉक हा उपक्रम व्यावसायिक तत्वावर चालवून शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यापक कार्यक्रम आखला जात नाही, याचे वैषम्य सातारकरांना वाटते.





