Gramin news :’विघ्नहर’ कारखान्याच्या ३९ व्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता; ९ लाख ३ हजार ७११ मे.टन ऊसाचे गाळप पूर्ण

ओझर : जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ चे गळीत हंगामात ९ लाख ३ हजार ७९१ मे. टन उसाचे गाळप केले असून १ लाख ९१ हजार १०१ क्विटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. तसेच सहवीज निर्माती प्रकल्पातून ३ कोटी ५१ लाख ९२ हजार ००५ युनिट वीज निर्यात केली. कारखान्याचा विस्तारीत डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु असून डिस्टीलरी प्रकल्पातून ८५ लाख ३९ हजार ३८२ लिटर अल्कोहोलची व १३ लाख ९० हजार ८७६ लिटर इथेनॉल निमीती केली असल्याची माहिती विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितली.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या ३९ व्या गाळप हंगामाची यशस्वी सांगता आज मंगळवार दि. १३ मे रोजी करण्यात आली. यावेळी सुमित्रा शेरकर, योगिता शेरकर व व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक भास्कर घुले, ऊस तोडणी कामगार, तोडणी मुकादम, ऊस वाहतूक चालक-मालक कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेअरमन सत्यशिल शेरकर बोलताना म्हणाले की, गाळप हंगाम २०२४-२०२५ मध्ये कार्यक्षेत्रात गाळपासाठी १९०५० एकर ऊस उपलब्ध झाला. सरासरी एकरी टनेज ४७.२० मे.टन मिळाले. विाजहरचे ९ लाख ३ हजार ७११ मे.टन गाळप झाले. याकामी सर्व संचालकांनी आपआपल्या गटांमध्ये योग्य नियोजन व देखरेख करुन उत्कृष्ठ असे कामकाज केले, सर्व सभासद ऊस ऊपादक, कर्मचारी तोडणी, वाहतूकदार तसेच कारखान्याशी संबंधीत असलेल्या सर्व घटकांचे बहुमोल असे सहकार्य या गाळप हंगामासाठी लाभले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीविघ्नहरचा गाळप हंगाम यशस्वीरित्ता संपन्न झाल्याबद्दल कामगारांना १० दिवसांचा पगार बक्षिस म्हणून देण्यात येणार असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी यावेळी जाहिर केले. तसेच ते पुढे म्हणाले की, यावर्षी थोडे ऊसाचे गाळप कमी झाले असले तरी पुढील वर्षी सुरुवातीपासून ८००० ते ८५०० प्रती दिनी ऊसाचे गाळप करुन एकुण १३ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे. आपल्या कारखान्याचा सन २०२४-२५ हा महाराष्ट्रातील एकमेव कारखाना असा असेल की, एकाच वेळी कारखाना उभारणी, चाचणी व गळीत हंगाम घेण्यात आलेला आहे. या बहल त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.
स्वागत करताना कार्यकारी संचालक भारकर घुले म्हणाले की, विघ्नहरचा नव्याने ६५ केएलपीडी क्षमतेचा महत्वकांशी विस्तारीत इथेनॉल प्रकल्प या हंगामात पूर्ण क्षमतेने चालविला गेला असून त्यातून सुमारे ८५ लाख ३९ हजार ३८२ लिटर प्रतिदिनी क्षमतेने उत्पादन घेतले जात आहे. सदरचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जात असल्याने विघ्नहरच्या यशात मोठी भर पडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, सर्व ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचा अधिकारी वर्ग, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार ऊस तोड कामगार आदि सर्व घटकांनी अतिशय मेहनत घेवून केलेल्या कामाचे फलित म्हणजेच या हंगामात मिळालेले जास्तीचे ऊस टनेज होय.
३९ व्या गळीत हंगामाच्या सांगते नमित्त चालु वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेल्या एकूण-४७ कामगारांचा चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ सदस्यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि स्मार्टवॉच भेट म्हणून देण्यात येवून यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेक्रेटरी अरुण थोरवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक विवेक विठ्ठलराव काकडे यांनी मानले.





