Gramin News : शिरूर बाह्य महामार्गावर पिस्तूलसह एकाला अटक

शिरूर : शिरूर बाह्यमार्गावर दि नाना स्पॉट धाब्या जवळ कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा ४० हजार पाचशे रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. दिपक बबन गुंजाळ (रा. गोलेगाव रोड, शिरूर, ता. शिरूर जि. पुणे) या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करत असताना या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक गुंजाळ हा कमरेला पिस्तूल लावून शिरूर बाह्य महामार्गावर बंद असलेल्या दी नाना स्पॉट धाब्याजवळ उभा आहे.
अशी माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक यांनी दी नाना स्पॉट धाब्यावर सापळा रचून आरोपीला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे कंबरेला एक गावठी पिस्टल व मॅग्झीनमध्ये एक जिवंत काडतुस असा एकूण ४० हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, प अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, सागर माळ यांनी केली असून पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन करत आहे.
सात दिवसातली ही दुसरी कारवाई आहे.शिरूर शहरात गेल्या ७ दिवसापुर्वी किरण पवार ,साईनगर शिरूर याला बेकायदा पिस्टल वापरल्याप्रकरणी अटक केले होते. शिरूर शहरासह तालुक्यात अनेक जण बेकायदा पिस्टल वापरत असल्याची चर्चा वारंवार होत आहे. यासाठी पोलीस यंत्रणेने सतर्क राहून योग्य वेळी कार्यवाही करणे गरजेचे आहे. पोलिसांनी अशी अवैध पिस्टल बाळगणा -र्यांची माहीती घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.





