Hemant Dhome: “मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी मतदान करा”; हेमंत ढोमेची भावनिक साद

Hemant Dhome : मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. अवघ्या राज्याचंच नव्हे, तर देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत अनेक मान्यवर आणि कलाकार मतदानाचा हक्क बजावत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.
मुंबईत सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी उत्साह दिसून येत आहे. मात्र काही भागांत मतदार यादीतील गोंधळ, नाव न सापडणं, ईव्हीएम बंद पडणं अशा तक्रारी समोर आल्या असून निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
मराठी माणसासाठी!
‘महाराष्ट्राच्या’ मुंबईसाठी!
सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा…
बाहेर पडा मतदान करा…
१० वर्षांनी आलेली संधी चुकवू नका! #मुंबई_महानगरपालिका #मुंबई #मराठी pic.twitter.com/j9Bl48snBr— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) January 15, 2026
अशातच ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर एक भावनिक आवाहन केलं आहे. त्यांनी मतदानाचा सेल्फी शेअर करत लिहिलं आहे, “मराठी माणसासाठी! महाराष्ट्राच्या मुंबईसाठी! सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा. बाहेर पडा, मतदान करा. १० वर्षांनी आलेली ही संधी चुकवू नका.”
दरम्यान, मराठी कलाकारांसह इतर क्षेत्रातील मान्यवरही मतदानासाठी नागरिकांना प्रेरित करत आहेत. सचिन तेंडुलकर यांनीही सकाळी कुटुंबासह मतदान करत मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
दुसरीकडे, गुजराती अभिनेत्री जिगना त्रिवेदी हिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून मुंबई आणि महाराष्ट्राच्या भविष्यासंदर्भात मत व्यक्त केलं आहे. “आपण घरातील छोट्या गोष्टींसाठी जबाबदारी मागतो, मग महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार गांभीर्याने करायला हवा,” असं ती म्हणाली. विकास महत्त्वाचा आहे, पण तो माणसाचा श्वास कोंडणारा नको, असंही तिनं स्पष्ट केलं.
एकूणच, आजच्या मतदान प्रक्रियेत कलाकार आणि नागरिकांकडून ‘जबाबदारीनं मतदान करा’ असा एकच संदेश दिला जात आहे.





