Hemant Dhome: “झुरळांपासून जनआंदोलनापर्यंत!” हेमंत ढोमेचा ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला जोरदार पाठिंबा
Hemant Dhome हेमंत यांनी या पोस्टमध्ये अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचंही कौतुक केलं. “लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत आणि त्या जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, अशी अपेक्षा आहे,” असं त्यांनी म्हटलं. त्यांनी या पार्टीच्या इन्स्टाग्राम पेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला.

Hemant Dhome: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. व्यंगात्मक पद्धतीने सुरू झालेल्या या चळवळीला तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून अवघ्या काही दिवसांत या पक्षाच्या सोशल मीडिया पेजला तब्बल १३ मिलियनहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. आता या चर्चेत मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचीही भर पडली आहे. हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी या चळवळीला उघडपणे पाठिंबा देत सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली होती. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. अनेकांनी या वक्तव्याचा निषेध केला. त्यातूनच ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाने एक व्यंगात्मक राजकीय चळवळ सुरू झाली. या चळवळीने काही दिवसांतच मोठं लक्ष वेधून घेतलं आहे. (Hemant Dhome)
हेमंत ढोमे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये या चळवळीचं समर्थन करत विरोध करणाऱ्यांवर टीका केली. “कॉक्रोच जनता पार्टीला आताच राजकीय विरोध करणाऱ्यांच्या बुद्धीमत्तेची कीव येते,” असं त्यांनी स्पष्टपणे लिहिलं. लोक एकत्र येऊन व्यवस्थेविरोधात प्रश्न विचारू शकतात, हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
कॅाजपा ला आत्ताच (राजकीय) विरोध करणाऱ्यांच्या बुद्धीमत्तेची किव येते…
एककल्ली व्यवस्थेच्या विरोधात लोक एकत्र येऊ शकतात, प्रश्न विचारू शकतात ही आशा सोडलेल्या समाजात जर एक आशेचा किरण दिसतो आहे तर ही सुदृढ लोकशाही साठी अत्यंत महत्वाची आणि सकारात्मक अशी बाब आहे. ज्याचं स्वागत माझ्या… pic.twitter.com/PcjDtCbHhN— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 21, 2026
ढोमे पुढे म्हणाले की, “ज्या समाजाने आशा सोडली आहे, तिथे जर लोक पुन्हा प्रश्न विचारू लागले असतील तर ती सकारात्मक बाब आहे. या आंदोलनाचं पुढे काय होईल हा वेगळा मुद्दा आहे, कारण अनेक आंदोलनं नंतर वेगळ्या दिशेने गेल्याचं आपण पाहिलं आहे. पण लोकशाहीत पर्याय असणं खूप महत्त्वाचं आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण आलं आहे. (Hemant Dhome)
हेमंत यांनी या पोस्टमध्ये अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचंही कौतुक केलं. “लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत आणि त्या जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, अशी अपेक्षा आहे,” असं त्यांनी म्हटलं. त्यांनी या पार्टीच्या इन्स्टाग्राम पेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला.
दरम्यान, ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची सुरुवात अभिजीत दिपके या तरुणाने केली आहे. मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असलेला अभिजीत सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे शिक्षण घेत आहे. त्याने सोशल मीडियावर वेबसाईट, इन्स्टाग्राम आणि एक्स अकाऊंट सुरू करून ही मोहीम सुरू केली. यापूर्वी तो आम आदमी पार्टी साठीही काम करत होता. डिजिटल प्रचार आणि मीम मोहिमांमध्ये त्याचा अनुभव असल्याने ही चळवळ अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.





