ZP, पंचायत समिती उमेदवारांना खर्च मर्यादा किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

मुंबई: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या घोषणेनुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार असून ७ फेब्रुवारीला निकालाचे चित्र स्पष्ट होईल. गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या राजकीय पक्षांमध्ये आणि इच्छुकांममध्ये या घोषणेमुळे मोठी लगबग सुरू झाली आहे.
निवडणूक आयोगाने यावेळेस उमेदवारांसाठी खर्चाची नवी मर्यादा देखील निश्चित केली असून ती जिल्हा परिषदेच्या जागांच्या संख्येनुसार विभागण्यात आली आहे. ज्या जिल्हा परिषदांमध्ये ७१ ते ७५ निवडणूक विभाग आहेत, तिथे जिल्हा परिषद उमेदवाराला ९ लाख रुपये आणि पंचायत समिती उमेदवाराला ६ लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल. ६१ ते ७० विभाग असलेल्या जिल्ह्यांत ही मर्यादा अनुक्रमे ७.५० लाख आणि ५.२५ लाख रुपये असेल, तर ५० ते ६० विभाग असलेल्या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी ६ लाख आणि पंचायत समितीसाठी ४.५० लाख रुपयांची मर्यादा आखून देण्यात आली आहे.
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना खर्च मर्यादा पुढील प्रमाणे असेल: ७१ ते ७५ निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी ९ लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी ६ लाख रुपये खर्च मर्यादा असेल. ६१ ते ७० निवडणूक विभाग असेल्या… pic.twitter.com/SAfphliAit— Maharashtra SEC (@MaharashtraSEC) January 13, 2026
या निवडणुकीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण ७३१ जिल्हा परिषद जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यातील ३६९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर १४६२ पंचायत समिती जागांपैकी ७३१ जागांवर महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठीही जागांचे सविस्तर आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार १६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणुकीच्या सूचनेची प्रसिद्धी केली जाईल. याच दिवसापासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात होईल आणि २१ जानेवारीपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येतील. २२ जानेवारीला अर्जांची छाननी केली जाणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी असेल. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असून आतापासूनच राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे.





