पुणे | बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; दोन वैमानिकांसह तिघांचा मृत्यू

पुणे {प्रभात वृत्तसेवा} – बावधन परिसरात डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेत दोन वैमानिकांसह तिघांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर जळून खाक झाले.
हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर भरकटल्याने कोसळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. हा अपघात बुधवारी सकाळी झाला.
वैमानिक गिरीशकुमार पिल्लई (वय ५३), कॅप्टन परमजीत सिंग (वय ६४) आणि अभियंता प्रीतम भारद्वाज (वय ५६) या तिघांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीचे हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते.
पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टमधील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर मंगळवारी रात्री मुक्कामाला होते. बुधवारी सकाळी साडेसात वाजता या हेलिकॉप्टरने मुंबईतील जुहूकडे उड्डाण घेतले.
हेलिपॅडपासून दीड किलोमीटर अंतरावरच असणाऱ्या बावधन परिसरामध्ये के.के.कन्स्ट्रक्शन टेकडी या डोंगराळ भागात धुक्याचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर भरकटले आणि कोसळले.
या अपघातानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हेलिकॉप्टर कोसळल्याबाबतचा दूरध्वनी आला. हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैन्हया थोरात आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.
अपघाताची माहिती मिळताच वारजे, औंध, कोथरुड येथील अग्निशमन वाहने, मुख्यालयातून एक रेस्क्यु व्हॅन आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नांदेड सिटी अग्निशमन दलाकडून एक बंब, दोन रेस्क्यु व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक अभियंता होते. डोंगराळ भागात कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली.
त्यामध्ये हेलिकॉप्टर जळून खाक झाले. अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह अर्धा किलोमीटर लांब आणत पोलिसांकडे दिले.
मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविले. नातेवाईक आल्यानंतर त्यांच्या ताब्यात मृतदेह दिले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुनील तटकरे यांना आणण्यासाठी घेतले होते उड्डाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी याच हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. ते पुण्याहून परळीला गेले होते आणि याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. तटकरे हे हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून मुंबईला रवाना झाले होते.
बुधवारी सकाळी या हेलिकॉप्टरने तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईतील जूहूच्या दिशने उड्डाण केले होते, याला हिंजवडी पोलिसांनीही दुजोरा दिला.
हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच बावधन येथील डोंगराळ भागात हेलिकॉप्टर कोसळले. त्यात दोन वैमानिकांसह एका अभियंत्याचा मृत्यू झाला आहे.
दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र या दुर्घटनेचा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) पथक तांत्रिक तपासणी करणार आहे. – विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड





