Maharashtra Rain : राज्यातील ‘या’ जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; नागरिकांचे झाले मोठे नुकसान !

Maharashtra Rain | आठ दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार बघायला मिळाला. जिल्ह्यातील अनेक भागात पहाटे मुसळधार पाऊस झाला असून या पावसामुळे शहरातील अनेक भागांमधील रस्त्यांसह ग्रामीण भागातील शेत शिवारही पाण्याखाली गेली आहेत. तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
मागील आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे पूरस्थिती ओसरली होती. तर शेतक-यांची देखील पीक काढणीची लगबग पाहण्यास मिळत होती. मात्र परभणी जिल्ह्यात पहाटे पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. शहरासह जिल्ह्यातील शेत शिवार पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.
मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. परभणी शहरातील संत गाडगेबाबानगर, साईबाबानगर, अक्षदा मंगल कार्यालय परिसर भागात मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. गाडगेबाबा नगरमध्ये महानगरपालिका पाणी काढण्याचे प्रयत्न करत आहे.
अगोदरच्या पावसातून वाचलेले सोयाबीन शेतक-यांनी काढले खरे मात्र रात्रीच्या पावसाने तेही भिजले. मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील शेतकरी पांडुरंग पंडितराव भिसे यांच्या शेतात काल दिवसभर सोयाबीन कापून मळणी यंत्राच्या साह्याने सोयाबीन काढलं रात्री शेतात ठेवलं होतं. पहाटे मुसळधार पाऊस झाला आणि हे सोयाबीन वाचवण्यासाठी शेतक-यांनी चक्क मांडी एवढ्या पाण्यातून सोयाबीनचे पोते बाहेर काढले आहेत.





