Heavy rain in Japan : संततधार पावसाने जपानला झोडपले; एकाचा मृत्यू तर सात जण बेपत्ता

Heavy rain in Japan – जपानच्या उत्तरमध्य नोटो प्रांताला आज जोरदार पावसाने झोडपले. या पावसामुळे या प्रांतात भूस्खलन आणि पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले असून याच प्रांतात या वर्षाच्या सुरुवातीला भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता.
त्या आपत्तीतून सावरत असतानाच अतिवृष्टीचे संकट उभे राहिले आहे. या पावसामुळे उत्तर जपानमधील इशिकावा भागात एकाचा मृत्यू झाला असून सात जण बेपत्ता आहेत.
सुझू, वाजिमा आणि नोटो नगरपालिकेतील नद्यांमध्ये मृत व्यक्ती वाहून गेल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. शिवाय, हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्यांनी या प्रदेशात मोठ्या पुराचा इशारा दिल्यानंतर जवळपास ४० हजार लोकांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाजिमा शहरातील सुमारे १८ हजार लोकांना आणि सुझूमधील आणखी १२ हजार लोकांना होन्शु बेटावरील इशिकावाच्या सुरक्षित झोनमध्ये आश्रय घेण्यास सांगण्यात आले आहे.
तत्पूर्वी, जपान हवामान संस्थेने इशिकावा प्रदेशात मुसळधार पावसासाठी जीवघेणा इशारा जारी केला होता. हा इशारा उद्या दुपारपर्यंत राहण्याची अपेक्षा आहे. या भागातील १२ नद्यांचे पात्र ओसंडून वाहू लागले आहे.
इशिकावा, यामागाता आणि निगाता मधील काही भागांसाठी डोंगरावरून वाहत येणाऱ्या चिखलाचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे. अनेक घरांना पूराचा धोका असून वाजिमा येथील दोन जिल्ह्यांतील काही रहिवासी भूस्खलनामुळे अडकून पडले आहेत.





