राजगडमध्ये पावसाचा हाहाकार; भात पिकाचे मोठे नुकसान, बळीराजा संकटात!

नसरापूर : राजगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, काढणीला आलेले भात पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. एकमेव भात शेतीवर अवलंबून असलेल्या बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
भात पिके जमीनदोस्त, दर्जा खालावला
ऐन काढणीच्या तोंडावर पावसाने थैमान घातल्याने शेतात उभी असलेली भात पिके कोसळली आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके सडली आहेत, तर भिजलेल्या धान्याचा दर्जा खालावल्याने बाजारभावही घसरला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे.
रानडुकरांचा धुमाकूळ, दुहेरी फटका
पावसाबरोबरच वन्यजीवांचाही त्रास वाढला आहे. रानडुकरांनी अनेक ठिकाणी शेतात घुसून पिके उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे आधीच पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांत अधिक भर पडली आहे.
बिबट्याचा वाढता वावर, शेतकऱ्यांची भीती वाढली
या नुकसानीवरून शेतकरी सावरत नाहीत तोच आता बिबट्याच्या वाढत्या वावराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. विंझर, नसरापूर परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी गुरेढोरे पाणवठ्यांजवळ वावरताना दिसत असल्याने पशुपालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शेतात जाण्यास शेतकरी घाबरू लागले असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
तातडीने पंचनाम्याची व मदतीची मागणी
राजगड तालुका हा मुख्यतः भात शेतीवर अवलंबून असल्याने या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
“पावसाने आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. घरची आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी,”
– लक्ष्मण भोसले, प्रगतशील शेतकरी, विंझर
“आमचे पोट हातावर आहे. रानडुकरांनी आणि पावसाने पिके उद्ध्वस्त केली. आमच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे. शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी,”
-विक्रम सोनवणे, शेतकरी





