Pakistan : पाकमध्ये अतिवृष्टीचे ४५ बळी; मृतांमध्ये २३ लहान मुलांचा समावेश
पाकिस्तानातील खैबर पख्तुनक्वा प्रांतात गेल्या १० दिवसात झालेल्या अतिवृष्टीशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये किमान ४५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Pakistan – पाकिस्तानातील खैबर पख्तुनक्वा प्रांतात गेल्या १० दिवसात झालेल्या अतिवृष्टीशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये किमान ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०५ जण जखमी झाले आहेत, असे पाकिस्तान आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटले आहे.
खैबर पख्तुनख्वा प्रांतासह देशाच्या विविध बागांमध्ये २५ मार्चपासून संततधार पाऊस सुरू आहे. दरडी कोसळणे, घरांची भिंत, छप्पर कोसळणे किंवा पुराच्या पाण्यात बुडण्यासारख्या घटनांमध्ये आतापर्यंत ४५ जण मरण पावले आहेत.
त्यात १७ पुरुष, ५ महिलांसह २३ लहान मुलांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ४५ पुरुष, १६ महिला आणि ४४ मुलांचा समावेश असल्याचे आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटले आहे.
दोन डझनांहून अधिक जिल्ह्यांमध्ये किमान ४४२ घरांना या अतिवृष्टीचा फटका बसला असून, त्यापैकी ३८२ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे आणि ६० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या काही भागांमध्ये ९ एप्रिलपर्यंत अजूनही मोठा पाऊस येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पर्यटकांनी या भागाचा प्रवास करू नये. विशेषतः असुरक्षित भागात जाऊ नये आणि अधिकृत संस्थांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





