Pune District : चांडोली येथे वादळासह मुसळधार पाऊस; गोठ्यावर नारळाचे झाड पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
Pune District : चांडोली बुद्रुक येथे नारळाचे झाड गोठ्यावर पडल्याने गोठ्याच्या आत असलेले शेतकरी हरिभाऊ रघुनाथ थोरात (वय ६३) यांचा जागीच मृत्यू झाला.

पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक आणि पिंपळगाव खडकी या गावांच्या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी घरे व गोठ्यांचे पत्रे उडून गेले. झाडे उमळून पडली, विजेचे खांबही पडले. चांडोली बुद्रुक येथे नारळाचे झाड गोठ्यावर पडल्याने गोठ्याच्या आत असलेले शेतकरी हरिभाऊ रघुनाथ थोरात (वय ६३) यांचा जागीच मृत्यू झाला.
आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे मंगळवार, दि.२ रोजी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावात अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे व जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडून गेले. कांदा चाळीचे पत्रे उडून जावून कांदा पावसामध्ये भिजला गेला. अनेक ठिकाणी झाडे कोसळून रस्त्यावर पडली. विजेचे खांब पडले. फळबागांचे नुकसान झाले. शेतातील मका, कडवळ व पालेभाज्या या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
प्रशासनाने त्याचे ताबडतोब पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण थोरात पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रीती थोरात पाटील यांनी केली. तसेच पिंपळगाव (खडकी) परिसरात अनेक ठिकाणी केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली. त्यामुळे केळी उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. नवनाथ पोखरकर यांची सुमारे २ एकर क्षेत्रातील व विलास पोखरकर यांची ६ एकर क्षेत्रातील केळीची बाग पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. केळीची झाडे मोठ्या प्रमाणात कोसळल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संपूर्ण वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
नुकसान भरपाई त्वरित द्यावी
केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून शासनाकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून महसूल प्रशासनाला तातडीने पंचनामे करावेत. कृषी विभाग व महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर त्यांनी केली आहे.
हेही वाचा : Iran attack : इराणचा कुवेत आणि बहरीनवर मोठा हल्ला; जगात पुन्हा खळबळ





