मान्सूनचा दणका…! पुण्यासह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा

पुणे : पाऊस पहिला जणू सानुला, बरसून गेला… बरसून गेला,’ असे तरल भाव पावसाच्या आगमनाने कवींनी टिपून ठेवले आहेत. मात्र, यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात नियोजित वेळेच्या पंधरा दिवस दणक्यात आगमन झाले असून, मुंबईसह महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत पावसाने दाणादाण उडवली आहे.
अनेक ठिकाणे जलमय झाली असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय मालमत्तेचे नुकसान आणि जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे, तसेच राज्यातील काही भागांत येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.
नैऋत्य मौसमी वाऱ्यांनी आगमनातच धुव्वा उडवला असून, मुसळधार बरसणाऱ्या सरींनी तारांबळ उडवून दिली आहे. ठिकठिकाणी वाड्या वस्त्यांमध्ये पाणी घुसले असून, नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे.
याशिवाय मुंबईत मेट्रो स्टेशनमध्ये पाणी घुसले असून, मेट्रोचे वेळापत्रक कोलमडले आहे. नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल महाराष्ट्राच्या मुंबई, पुणे, सोलापूरसह आणखी काही भागांत झाली आहे, तसेच कमी दाबाचे क्षेत्र मराठवाडा आणि लगतच्या भागावर स्थिर आहे.
कोकण, गोव्यात पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तसेच विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहेच;
याशिवाय सिंधुदुर्ग येथे मंगळवारी (दि. २७) आणि रत्नागिरी येथे येत्या ४८ तासांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला असून, या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे, तसेच धोक्याची सूचनाही देण्यात आली आहे.
पुणे आणि सातारा जिल्हा, तसेच त्यांचा घाट विभाग येथे पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी वेधशाळेने रेड अलर्ट दिला आहे.
कोल्हापूर, सातारा येथे आणि त्याच्या घाट विभागात मंगळवारी (दि. २७ मे) रेड अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पुढील तीन ते चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथे पुढील दोन ते तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव येथे पावसाला सुरुवात झाली आहेच. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड येथे मंगळवारी (दि. २७ मे) रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहून अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय संपूर्ण विदर्भात पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.





