मुंबई : नवरात्र गेली, दसरा गेला आणि आता दिवाळीही गेली. मात्र, राज्यातील पावसाचा जोर कमी होत नाही आहे. ऐन दिवाळीला काही भागात जोरदार पाऊस झाला. आज सकाळपासून काही ठिकाणी पाऊस कोसळत असून ढगाळ वातावरण झाले आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागानेही पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील काही दिवस पावसाचे ढग राज्यावर कायम असणार हे स्पष्ट आहे. पुढील दोन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. फक्त पुणेच नाही तर राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस वादळी वा-यासह जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात काही भागात पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, रायगड, मध्य मध्य महाराष्ट्र, सोलापूर, पुणे, आहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, नांदेड या भागात वादळी वा-यासह पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतरण होणार असून अरबी समुद्रातील क्षेत्रामुळे मुंबईसह लगतच्या परिसरांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज चक्रीवादळात रुपांतर होणार बंगालच्या उपसागरातील तीव्र दाबाच्या क्षेत्राचे सोमवारी चक्रीवादळात रूपांतर होईल. मंगळवारी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किना-याला धडकेल. त्यामुळे सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मुंबईपासून ४५० किमीवर आहे. त्याचे रूपांतर कदाचित तीव्र दाबाच्या क्षेत्रात होईल. हे क्षेत्र महाराष्ट्रापासून दूर जात असले तरी सोमवारी पुन्हा ते वळण घेण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या मधल्या भागात बुधवारी सरकेल. यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर बुधवार ते गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता आहे.