पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार ! पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा अंदाज

Pune News – राज्यातील बहुतांश भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. तर रविवारच्या रात्री पासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सर्वत्र एकच दाणादाण उडवत जनजीवन विस्कळीत केल्याचे बघायला मिळाले आहे.
असे असताना पुढील तीन दिवस पुण्यासह महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याकडून(आयएमडी) वर्तवण्यात आला आहे. खास करून कोकण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील डोंगर माथ्यांवर चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही हवामान विभाग आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अलिकडे झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा देखील काहीसा सुखवलेला आहे.
तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर पूर्व विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाने दांडी दिल्याने बळीराजा मोठ्या विवंचनेत सापडला आहे. गेल्या वर्षी अल निनोचा परिणाम होता. त्यामुळे समाधानकारक पाऊस झाला नाही.
मात्र यावेळेस निनो पश्चिम उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे. ज्याच्यामुळे चांगला पाऊस आपल्याला मिळू शकतो. अशी दिलासादायक शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.





