Bomb threat: कोर्ट बॉम्बने उडविण्याची पुन्हा धमकी
Bomb threat:

शिवाजीनगर न्यायालयात पक्षकार, वकिलांचे हाल, कामकाजावरही परिणम
Bomb threat: शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याने सोमवारी (दि. २३) परिसरात एकच खळबळ उडाली.
परदेशातून दुपारी हा मेल प्राप्त झाला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयीन कामकाज तातडीने थांबविण्यात आले. तसेच संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी असाच ई-मेल आला होता. त्यामुळे २१ दिवसात हा दुसऱ्यांदा ई-मेल आला आहे.
पक्षकार, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना एकाच वेळी बाहेर जाण्यास सांगितल्याने थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, न्यायालय मोकळे होताच पोलीस, बॉम्बशोधक आणि विनाशक पथकाने (बीडीडीएस) संपूर्ण न्यायालयाची तपासणी केली.
तपासणीनंतर रिमांडसारख्या आवश्यक महत्त्वाच्या सुनावण्या झाल्या. दिवाणी, कौटुंबिकसह फौजदारीमध्ये जामीनसह, मनाई ऑर्डरसह विविध नियमित सुनावण्यांना पुढील तारीख देण्यात आली.
दरम्यान, दिवाळी सुट्टी, त्यानंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप, आता या अफवेने पुढील तारीख मिळाल्याने पक्षकार, वकिलांनी नाराजी व्यक्त केली. अशा घटनेने पुन्हा न्यायालयाने कामकाज ठप्प होऊ नये, याची काळजी घेण्याची मागणी पक्षकारांनी केली.





