Sonia Gandhi book objection: सोनिया गांधींना कायदेशीर नोटीस
Sonia Gandhi book objection:

पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवर नातू सात्यकी यांचा आक्षेप
Sonia Gandhi book objection: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयीच्या उल्लेखांवर आक्षेप घेत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकातील दोन उल्लेख दिशाभूल करणारे आणि सावरकरांची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा आक्षेप नोटिशीत नोंदविण्यात आला आहे.
ॲड. संग्राम ए. कोल्हटकर यांच्यामार्फत पाठविण्यात आलेल्या नोटिशीत पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक २०१ व ४४३ वरील मजकुरावर आक्षेप घेण्यात आला आहे. पृष्ठ २०१ वरील उल्लेखात सावरकरांचा दयेच्या याचिका लिहिणारे आणि ब्रिटिशांशी सहकार्य करणाऱ्यांच्या संदर्भात उल्लेख असल्याचे, तर पृष्ठ ४४३ वरील मजकुरात त्यांच्या हिंदुत्वविषयक विचारांचे चित्रण हिंदूंच्या वर्चस्वाच्या दृष्टीने केल्याचे नोटिशीत म्हटले आहे. हे उल्लेख ऐतिहासिक संदर्भाविना असून, सावरकरांचे कार्य व विचार यांचे चुकीचे चित्र उभे करतात, असा सात्यकी सावरकर यांचा दावा आहे.
नोटिशीत सावरकरांच्या कारावासाचा, अंदमानातील सेल्युलर जेलमधील शिक्षेचा, तसेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात सावरकरांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट, माहितीपट आणि इतर उपक्रम राबविल्याच्या दाव्यांचा संदर्भही देण्यात आला आहे.
नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांत बिनशर्त लेखी माफी मागावी, सार्वजनिक स्पष्टीकरण द्यावे आणि पुढील आवृत्त्या, पुनर्मुद्रणे व डिजिटल आवृत्त्यांमध्ये आवश्यक दुरुस्ती किंवा बदल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या मुदतीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास कायदेशीर उपायांचा विचार केला जाईल, असेही नोटिशीत नमूद आहे.





