Rain Update: राज्यात पुन्हा पावसाचा जोर ! कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्याला ‘रेड अलर्ट’

Maharashtra Rain Update: राज्यात बहुतांश भागात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुंबईत अनेक भागात शनिवारी दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पडलेल्या पावसाने रविवारीही जोरदार हजेरी लावली. कोकण आणि पश्िचम महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या भागांनाही रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. येत्या तीन, चार दिवस सर्वच भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणात पुन्हा जोरदार पाऊस झाला आहे.
प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे रविवारी सकाळी आठवाजेपर्यत १९३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे.
या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून काही धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईत रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. तथापि, हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केल्याने पावसाचा जोर कमी राहील. अशीच स्थिती विदर्भात राहण्याची शक्यता आहे. विदर्भालाही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
रायगड जिल्ह्याला प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. रायगडमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, काही भागांत अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.





