Health | Bengaluru News : बंगळूरमधील ‘डेझइन्फो मिडिया अँड रिसर्च कंपनी’चे संस्थापक आणि सीईओ अमित मिश्रा यांचा रक्तदाब अचानक २३० पर्यंत वाढला आणि त्यांना अतिदक्षता विभागाता दाखल करावे लागले. मिश्रा यांनी त्यांचा हा अनुभव लिन्कड् इन वर पोस्ट केलेला आहे. आपल्याला याआधी कधीही रक्तदाबाचा त्रास झाला नव्हता किंवा आधी त्यासंदर्भातील लक्षणेही कधी दिसली नव्हती. त्यांची पोस्ट हायरल झाली असून अनेकांनी सतत काम आणि ताण यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे तसेच जीवाची जोखिम वाढत असल्याकडे लक्ष वेधले आहे. मिश्रा यांनी घटनेची तपशीलवार माहिती दिलेली आहे. त्या दिवशी शनिवार होता आणि घरीच ते लॅपटॉपवर काम करत होते. अचानक त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. ते म्हणतात, रक्तस्त्राव थांबायला तयार नव्हता. पांढरे शुभ्र वॉशबेसिन लालभडक झाले. कापसांच्या लाल बोळ्यांचा खच पडला. आपण आता कोमात जाणार असे वाटू लागले होते. मग मला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्याठिकाण इमर्जन्सी टीमला त्यांचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी २० मिनिटे प्रयत्न करावे लागले. पण खरा धक्का तर नंतर होता. ते म्हणतात, माझा रक्तदाब २३० वर पोचला होता. माझे डोके दुखत नव्हते, अस्वस्थता जाणवत नव्हती, कुठलीही लक्षणे दिसत नव्हती, मला या आधी कधीही रक्तदाबाचा त्रास झालेला नव्हता. हे सगळे अनपेक्षित घडले होते. त्यांना आयसीयूमध्ये दाखल केल्यावर रक्तदाब नियंत्रणात आणण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी मिश्रा अचानक आयसीयूमध्ये बेशुद्ध झाले. त्यांचा रक्तदाब यावेळी खूपच खाली आला होता. यामुळे डॉक्टर गोंधळून गेले, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. नंतरचे चार दिवस त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. इसीजी, एलएफटी, इको, कोलेस्टेरॉल, एन्जियोग्राफीचा त्यामध्ये समावेश होता. मिश्रा म्हणतात, सगळ्याच चाचण्याचे रिपोर्ट नॉर्मल आले. या घटनेतून काय बोध घ्यायचा याची यादी त्यांनी तयार केली. ते म्हणतात, उच्च रक्तदाब, ताण आणि आरोग्याच्या तक्रारी-व्याधी कुठलीही लक्षणे न दाखवता अनपेक्षितपणे प्रकटतात. त्यासाठी नियमित आरोग्यतपासणी गरजेची आहे. कधीही आरोग्य जोखमीत टाकून कामाच्या मागे धावण्यात शहाणपण नाही. ते म्हणतात, तुमचे शरीर नेहमीच स्पष्टपणे इशारे देईल याची खात्री नसते. उच्चरक्तदाब, ताण आणि आरोग्यविषयक जोखिम या गोष्टी हळूहळू शरीर व्यापत असतात. त्यासाठी काहीही झाले नसले तरी नियमित आरोग्यतपासण्या करून घेणे हिताचे ठरते. ते म्हणतात, काम महत्त्वाचे आहेच पण त्यासाठी आरोग्याची हेळसांड करणे कधीही मान्य होणार नाही. अनेकदा शरीर छोट्या गोष्टीतून इशारे देत असते पण आपण तंदुरुस्त आहोत असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात आपल्या शरीरात काहीतरी विपरीत घडत असते. ते म्हणतात, अनेक चाचण्या करूनही अचानक रक्तदाब का वाढला याचे निदान डॉक्टर करू शकले नाहीत. वैद्यक विज्ञानात अजूनही अनेक बाबी गूढ आहेत. कारण तब्बल १५ वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतरही माझा रक्तदाब अचानक का वाढला हे समजू शकले नाही. मात्र, एक गोष्ट समजली की कधीही तुम्ही स्वतःचे आरोग्य ऑप्शनला ठेवू शकत नाही. मिश्रा आता रुग्णालयातून घरी परतले असून त्यांच्यावर अजूनही उपचार चालू आहेत. नव्याने आयुष्य जगण्याची संधी दिल्याबद्दल डॉक्टर आणि रुग्णालयातील टीमला त्यांनी धन्यवाद दिले आहेत. ते म्हणतात, कालच मी रुग्णालयातून घरी परत आलो. आता मला दुसऱ्यांदा जीवन जगण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे आयुष्यात खरोखरच कशाला महत्त्व आहे आणि कोणत्या बाबींना प्राधान्य दिले पाहिजे हे ठरवण्यासाठी मला नव्याने संधी प्राप्त झालेली आहे. ते लिहितात, तुम्ही जर का हे वाचत असाल तर तुमच्यासाठी एक आठवण करून देतो. शरीराचे ऐका. माझ्यासारखे शेवटच्या क्षणी जागे होऊ नका.