पुणे – नीटसे जगही न पाहिलेल्या आणि अपघातामुळे मेंदूमृत झालेल्या अवघ्या ११ वर्षीय मुलाने अवयवदान करून तीन बालकांना जीवदान दिले आहे. या मुलाचे कुटुंब मूळचे बुलढाणा येथील आहे. मात्र, कामासाठी हे कुटुंब सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिकसळ या गावी आले. तेथे बालकाचे आई-वडील शेतमजूर आहेत.
डिकसळ या गावी हा मुलगा रस्त्याने जात असताना पाठीमागून चारचाकी गाडीने त्याला धडक दिल्याने त्याच्या डाेक्याला जबर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालय आणि नंतर ससून रुग्णालयात पाच जानेवारीला रात्री दाखल केले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने आणि उपचारांना कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने डाॅक्टरांनी सात जानेवारीला मेंदूमृत (ब्रेनडेड ) घोषित केले.
ससून रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक आणि अवयव प्रत्यारोपण समन्वयक सत्यवान सुरवसे, अरुण बनसाेडे, जगदीश बोरूडे आणि रत्नभूषण वाढवे यांनी अवयवदानाबाबत कुटुंबियांचे समुपदेशन केले त्यानंतर त्यांनी आणि सर्व नातेवाईकांनी अवयवदानाला संमती दिली.
त्याच्या दोन्ही किडनी प्रत्येकी कमांड हॉस्पिटल आणि सिम्बायोसिस हॉस्पिटल येथील रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले. तर, हृदय डी. वाय. पाटील महाविद्यालयात एका रुग्णाला देण्यात आले. तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या प्रक्रियेत पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या मुख्य समन्वयक आरती गाेखले यांनी सातारा ते पुणे आणि पुणे ते बुलढाणा येथे जाण्यासाठी कार्डियाक अॅम्ब्यूलन्स उपलब्ध करून दिली.
वैद्यकीय अधीक्षक तथा ब्रेनडेड कमिटीचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बधिरीकरण शास्त्र विभागाचे डाॅ. अनंतकुमार पांडे, ट्रॉमा आयसीयूमधील डाॅ. सुजीत क्षीरसागर आणि सर्व ट्रॉमा डाॅक्टर, कर्मचारी, डाॅ. हरिष ताटिया, डाॅ. अनंत बीडकर, डाॅ. राेहित बाेरसे, डाॅ. किरणकुमार जाधव, डाॅ. संजय व्हाेरा, डाॅ. साेनाली साळवी आदींचे याेगदान लाभले.
अवयवाच्या प्रतिक्षेत असलेली मागील तीन वर्षांतील देणगीदार आणि प्रत्यारोपणाची आकडेवारी
सन २०२१ –
एकूण देणगीदार – ४४
प्रत्यारोपण केलेले अवयव – ९७
फक्त मूत्रपिंड – ४९
फक्त यकृत – ४१
फक्त हृदय – ०२
मूत्रपिंड + स्वादुपिंड – ०२
मूत्रपिंड + यकृत – ०१
लहान आतडी – ०२
सन २०२२ –
एकूण देणगीदार – ४६
एकूण प्रत्यारोपित अवयव – ११८
फक्त मूत्रपिंड -६६
फक्त यकृत – ४४
फक्त हृदय – ०२
मूत्रपिंड + स्वादुपिंड – ०१.
हृदय + फुफ्फुस – ०२
सन २०२३
एकूण देणगीदार – ५८
प्रत्यारोपण केलेले अवयव – १५८
फक्त मूत्रपिंड -७४
फक्त यकृत -४३
फक्त हृदय – ०९
फक्त फुफ्फुस – १०
मूत्रपिंड + स्वादुपिंड -०८
मूत्रपिंड + यकृत – ०२
हृदय आणि फुफ्फुस – ०१