वॉशिंग्टन – अमेरिकन गुप्तचर खाते सीआयएचे संचालक विल्यम बर्नस् यांच्यासह भारत दौऱ्यावर आलेल्या सीआयएच्या अधिकाऱ्यात हवाना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याची ओळख अद्याप जाहीर केली नसली तरी त्याला वैद्यकीय मदत जाहीर करण्यात आली आहे, असे वृत्त सीएनएन या वृत्तसंस्थेने दिले आहे.
या घटनेने अमेरिकन प्रशासनात धोक्याची घंटा वाजली असून त्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या देशासाठी हेरगिरी करणारा कोणीही सुरक्षित नसल्याचा थेट संदेश बर्नस् यांना मिळाला आहे, असे दोन सूत्रांनी नमूद केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
या अधिकाऱ्याच्या भोवतीची परिस्थिती तपासण्यात येत आहे. सीआयएचे संचालक विल्यम बर्नस् यांच्या सोबत प्रवास केल्याने या अधिकाऱ्याला लक्ष्य बनवण्यात आले की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. जर प्रतिस्पर्धी गुप्तहेर संघटनांमधील कोणी हे घडवले असेल तर त्यांना हा अधिकारी बर्नस् यांच्यासोबत प्रवास करत आहे, याची कल्पना नसावी, असे वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे.
ही घटना भारतात घडल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यास सीआयएच्या प्रवक्त्यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या, मात्र, अमेरिकन प्रशासन या प्रत्येक घटनेची गांभीर्याने नोंद घेत आहे. बर्नस् हे अधिकाऱ्यांची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी आग्रही असतात. त्याच्या तळाशी जात असतात, असे या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न वाढवले आहेत. ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी निर्माण केलेल्या तज्ज्ञांच्या पथकाप्रमाणे आम्ही तज्ज्ञांची पथके तयार केली आहेत, असेही या प्रवक्त्यांनी सांगितले.
सीआयए संचालकांचा दौरा अत्यंत गोपनीय होता. मात्र, तरीही त्यांच्या दौऱ्याची माहिती मिळवून हा हल्ला कसा घडवला या शंकेने अमेरिकन अधिकारी चिंतीत आहेत, असे सीएनएनच्या वृत्तात म्हटले आहे.
बर्नस् यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांच्याशी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा केली होती. अमेरिकन गुप्तचरांच्या प्रमुखांसोबत आलेले सहकारी अफगाणिस्तानातू अमेरिकन फौजांच्या माघारीआधी अनेकदा भारतात येऊन गेले होते. या भेटीविषयी कोणतेही भाष्य करण्यास अमेरिकन दुतावासाने नकार दिला आहे. त्याच बरोबर भारतीय सुरक्षा यंत्रणांनीही याबाबत मौन बाळगले आहे.
अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यांना 2017मध्ये हवाना विषाणूंचा प्रथमत: संसर्ग 2017 मध्ये क्युबामध्ये झाला होता. त्यामुळे उच्च आणि मृदू स्तारावरील ध्वनी तरंगाचा भास होत अनैसर्गिक शारीरिक अनुभूती मिळत असते. चीन आणि वॉशिंग्टनमधील कर्मचाऱ्यांनाही या विषाणूचा संसर्ग झाला आहे. गेल्या महिन्यात कमला हॅरिस यांच्या दौऱ्याआधी या विषाणूच्या कथित संसर्गाच्या संशयामुळे दोन अमेरिकन कर्मचाऱ्यांना व्हिएतनाममधून हलवण्यात आले होते.