Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी वाशिमचे पालकमंत्रीपद सोडलं? ‘या’ मंत्र्याकडे जाणार जिल्ह्याची जबाबदारी

मुंबई : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याचा दाखला दिला आहे. पण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तथा रायगड व नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी हे पद सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूर पासूनचे वाशिमचे अंतर खूप जास्त आहे. यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. परिणामी त्यांनी वाशिमचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचा संबंध नाशिक व रायगडच्या वादाशी जोडला जात आहे. याविषयी राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
दत्ता भरणेंना मिळणार जबाबदारी?
हसन मुश्रीफ यांनी हा निर्णय घेताना उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनाही विश्वासात घेतले आहे. त्यांनी वाशिमचे पालकमंत्रिपद सोडल्यामुळे आता हे पद कुणाला मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे सध्या कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नाही. त्यामुळे आता वाशिमचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे





