अमरावती : राज्यात विधानसभा निवडणूका असल्याने सध्या प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश श्रीरामजी वानखडे यांच्या प्रचारार्थ गेल्या असताना त्यांनी टीका केली. काय म्हणल्या नवनीत राणा ? “देवासमोर वाढलेलं ताट खाण्याचं काम माझ्या नणंद बाईने केलं. दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचे काम माझ्या नणंद बाईने केलेले आहे. माझी नणंद बाई 3 टर्म पासून प्रतिनिधीत्व करत आहे. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात”, असं म्हणत माजी खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच नणंदबाईंना फक्त नोटा आवडतात. बाकी कार्यकर्ते सतरंजी उचलतात. माझ्या नणंद बाईने जाती जातींमध्ये विभाजन करून मत घेतले आहेत. मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचा काम नणंद बाई करत आहे. एकही रोजगार उपलब्ध दिला नाही. नणंद बाईने खूप कमावले आहे. तिकीट देणार म्हणून दर्यापूरच्या उमेदवारचा घर लुटले, असा आरोपदेखील नवनीत राणा यांनी यावेळी केला.