Haryana Election 2024: हरियाणात निवडणूक प्रचाराचा दणदणाट थांबला, 5 ऑक्टोबरला होणार मतदान

Haryana Assembly Elections 2024: हरियाणामध्ये 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार गुरुवारी (3 ऑक्टोबर) संध्याकाळी संपला. हरियाणात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी 10 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. हरियाणात दोन कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत. 90 सदस्यीय हरियाणा विधानसभेसाठी शनिवारी, 5 ऑक्टोबर रोजी एका टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचवेळी, जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालांसह मतमोजणी 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता निवडणूक प्रचार संपण्याच्या काही तास आधी, प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष भाजप, काँग्रेस, आप, INLD-BSP आणि JJP-आझाद समाज पक्ष यांनी रॅली आणि रोड शो करून मतदारांना आकर्षित करण्याचा शेवटचा प्रयत्न केला. मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, हरियाणातील सर्व 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी एकूण 20,629 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
जाहीर सभा किंवा रॅली काढण्यास बंदी –
अग्रवाल म्हणाले की, गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ नंतर कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला जाहीर सभा किंवा रॅली काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. भाजपने आपला निवडणूक प्रचार ‘डबल इंजिन’ सरकारच्या कृती आणि कामगिरीवर केंद्रित केला. आरक्षण, भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि घराणेशाहीच्या राजकारणावर त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांचे प्रश्न हेच मुख्य मुद्दे आहेत.
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे राहुल गांधी आणि भूपेंद्र सिंग हुडा, भाजपचे योगी आदित्यनाथ आणि नायब सिंग सैनी, जेजेपीचे दुष्यंत चौटाला आणि आयएनएलडीचे अभय सिंह चौटाला यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी आपापल्या पक्षांचा प्रचार केला. भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते. त्यांनी चार सभांना संबोधित केले. त्यांनी अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसवर हल्लाबोल केला.





