हरियाणा निवडणुकीसाठी ‘आप’ची चौथी यादी जाहीर; सीएम सैनी आणि विनेश फोगट यांच्या विरोधात दिले तिकीट

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत 21 उमेदवारांची नावे आहेत. लाडवामधून मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या विरोधात पक्षाने जोगा सिंग यांना उभे केले आहे. तर सुनील बिंदल यांना कर्नालमधून आणि श्याम मेहता यांना सिरसामधून तिकीट मिळाले आहे.
विनेश फोगट विरुद्ध कविता दलाल यांना तिकीट –
माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने कविता दलाल यांना तिकीट दिले आहे. त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल विज यांच्या विरोधात राज कौर गिल यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. सतबीर गोयत यांना कैथलमधून तर देवेंद्र गौतम यांना सोनीपतमधून तिकीट मिळाले आहे. निशांत आनंद गुरुग्राममधून निवडणूक लढवणार आहेत.
📢Announcement 📢
The Party hereby announces the fourth list of candidates for the state elections for Haryana Assembly.
Congratulations to all 💐 pic.twitter.com/oUKUrHwJIw
— AAP (@AamAadmiParty) September 11, 2024
‘आप’ने आतापर्यंत 61 उमेदवार उभे केले –
यापूर्वी मंगळवारी रात्री ‘आप’ने 11 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने निवडणुकीसाठी आतापर्यंत 61 उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर आहे. 90 सदस्यीय हरियाणा विधानसभेसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, दिल्लीत काँग्रेस आणि आप यांनी एकत्र लोकसभा निवडणूक लढवली, तर पंजाबमध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती.
काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर आम आदमी पक्षाने सोमवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. लोकसभा निवडणुकीत हरियाणात काँग्रेसने ‘आप’ला एक जागा दिली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. 2019 च्या हरियाणा निवडणुकीत ‘आप’ने 46 जागा लढवल्या, पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीतही ‘आप’ पूर्ण ताकदीने लढत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेतेही प्रचारात आहेत.





