हरियाणात भाजपचा उमेदवार सर्वांत श्रीमंत; संपत्ती पाहून व्हाल थक्क

चंदिगढ – हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेले अनेक उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यामध्ये माजी अर्थमंत्री आणि भाजपचे उमेदवार कॅप्टन अभिमन्यू सर्वांत श्रीमंत ठरले आहेत. कॅप्टन अभिमन्यू (वय ५६) हे ४१७ कोटी रूपयांच्या संपत्तीचे धनी आहेत. त्यांच्या खालोखाल अपक्ष उमेदवार सावित्री जिंदल (वय ७४) यांचा क्रमांक लागला आहे.
त्यांच्याकडे २७० कोटी रूपयांची मालमत्ता आहे. त्या उद्योगपती आणि भाजपचे खासदार नवीन जिंदल यांच्या मातोश्री आहेत. भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडाचा पवित्रा स्वीकारला. इतर कोट्यधीश उमेदवारांमध्ये विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते भुपिंदरसिंह हुडा हे २६ कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे (आयएनएलडी) नेते अभय चौताला यांच्याकडे ६१ कोटी रूपयांची मालमत्ता आहे. माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांच्या नावे ८२ कोटी रूपयांची संपत्ती आहे. ते जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) नेते आहेत. त्यामुळे बहुतांश राजकीय पक्षांकडे कोट्यधीश उमेदवारांची फौज असल्याचे स्पष्ट होत आहे.





