Haryana Election Results – सर्व अंदाज चुकवत आणि कथित सरकारविरोधी लाट निष्प्रभ ठरवत भाजपने हरियाणात विजयाची हॅट्ट्रिक केली. स्पष्ट बहुमताचा पल्ला गाठत त्या पक्षाने सत्ता राखली. विधानसभेच्या एकूण ९० पैकी ४८ जागा भाजपने जिंकल्या. तर, हरियाणाच्या सत्तेत कमबॅक करण्याचे स्वप्न भंगलेला कॉंग्रेस पक्ष ३७ जागांपर्यंतच मजल मारू शकला. हरियाणात सलग १० वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजपसाठी यावेळची विधानसभा निवडणूक अवघड असल्याचे मानले जात होते. कॉंग्रेसकडूनही सातत्याने आपल्यासाठी पोषक स्थिती असल्याचे दावे केले जात होते. मात्र, दमदार कामगिरी करत भाजप सलग तिसऱ्यांदा त्या राज्यात सरकार स्थापन करण्यास सज्ज झाला आहे. मागील २ निवडणुकांपेक्षा यावेळी अधिक जागा जिंकत भाजपने वर्चस्व सिद्ध केले. कॉंग्रेसचेही संख्याबळ यावेळी काही प्रमाणात वाढले. मात्र, भाजपची घोडदौड रोखण्यात त्या पक्षाची मजल अपुरी ठरली. इतर अनेक पक्ष रिंगणात असल्याने हरियाणातील निवडणुकीला बहुरंगी स्वरूप प्राप्त झाले. मात्र, ते पक्ष बिल्कूल प्रभाव पाडू शकले नाहीत. आपने यावेळची निवडणूक अतिशय जोमाने लढवली. मात्र, तो पक्ष भोपळाही फोडू शकला नाही. मागील निवडणुकीनंतर हरियाणात सरकार स्थापनेसाठी जननायक जनता पार्टीने (जेजेपी) भाजपशी युती केली. यावेळच्या निवडणुकीआधी त्यांच्यातील युती तुटली. आता जेजेपीला खातेही उघडता आले नाही. त्या राज्यातील आणखी एक महत्वाचा पक्ष असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय लोक दलाला (आयएनएलडी) केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने निवडणुकीआधी मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांना चेहरा बनवले होते. त्यामुळे त्यांच्याकडेच सुत्रे कायम राहणार असल्याचे निश्चित मानले जाते. ही बातमी नक्की वाचा… Haryana BJP Win: हरियाणात भाजपने काँग्रेसला मागे टाकून जे केले ते इतर पक्ष करू शकले नाहीत, जाणून घ्या कसे?