हरियाणात काँग्रेस – आपमध्ये युती नाही? 9:1 चा फॉर्म्युला काॅंग्रेसला अमान्य?

Haryana Assembly Elections 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात युतीबाबत सुरू असलेली चर्चा आता संपण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये जागांबाबत एकमत होत नाही. अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाने हरियाणा विधानसभा निवडणुकीत 50 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी पक्ष उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या एक ते दोन दिवसांत काँग्रेस आणि भाजपचे अनेक नेते आम आदमी पक्षात प्रवेश करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टी हरियाणात 10 जागांची मागणी करत होती मात्र काँग्रेस आम आदमी पार्टीला 10 जागा देण्यास तयार नाही. आम आदमी पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्षाला काँग्रेसचा फॉर्म्युला मान्य नाही. हरियाणामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हरियाणात काँग्रेस आणि आप यांनी युती करून निवडणूक लढवली होती. काँग्रेसने राज्यातील लोकसभेच्या 10 पैकी 9 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, तर आम आदमी पक्षाच्या वाट्याला केवळ कुरुक्षेत्र लोकसभा जागा आली होती.
हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आम आदमी पक्षाला विधानसभा निवडणुकीत 9:1 च्या फॉर्म्युलावर एकूण 10 जागा हव्या आहेत. पण हा फॉर्म्युला काँग्रेस पक्षाला मान्य नाही. त्यामुळे जागावाटपाचा मुद्दा रखडला असून, ही चर्चा जवळपास मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे.





