Harshvardhan Patil: साखर उद्योगाला नवी ऊर्जा! ९० कोटींच्या निधीतून उभारणार ‘ऊस उत्कृष्टता केंद्र’; हर्षवर्धन पाटील यांची घोषणा
Harshvardhan Patil: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि 'इस्मा'चा संयुक्त पुढाकार; ४५ कोटी सरकार तर ४५ कोटी साखर उद्योग देणार.

Harshvardhan Patil – देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘ऊस उत्कृष्टता केंद्रा’ची (शुगरकेन सेंटर ऑफ एक्सलन्स) उभारणी कोयंबतूर (तामिळनाडू) येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटमध्ये होणार असून, त्यासाठी ९० कोटी रुपयांचा संयुक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली.
देशातील ऊस शेतीचे भवितव्य बदलणारा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोयंबतूर येथे शास्त्रज्ञांसोबत झालेल्या विचारमंथन बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र उभारण्यात येणार असून, साखर उद्योगाकडून ४५ कोटी आणि केंद्र सरकारकडून ४५ कोटी रुपये अशा एकूण ९० कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प साकारला जाईल.
या उत्कृष्टता केंद्रातून कमी पाण्यात तग धरणारे, अधिक उत्पादन देणारे, रोगप्रतिकारक आणि हवामान बदलाशी सामना करणारे ऊस वाण विकसित केले जाणार आहेत. तसेच इथेनॉल, बायो-सीएनजी, हरित ऊर्जा, खोडवा उत्पादनक्षमता, निविष्ठा कार्यक्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ऊस शेतीला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील साखर उद्योगावर सहा कोटींहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी, सुमारे ५० लाख कर्मचारी आणि एक कोटीहून अधिक हंगामी मजुरांचे भविष्य अवलंबून असल्याचे सांगताना पाटील म्हणाले, उसाच्या वाढत्या तुटवड्यामुळे गाळप हंगाम दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे संशोधनाधिष्ठित, आधुनिक आणि शाश्वत ऊस शेती हा काळाचा आदेश बनला आहे. महाराष्ट्रात सध्या सुमारे दोन लाख शेतकरी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करत असून, हीच दिशा देशभर स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘कोयंबतूर’ म्हणजे ऊस संशोधनाची राजधानी
कोयंबतूर येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट ही १९१२ मध्ये स्थापन झालेली देशातील सर्वात जुनी आणि अग्रगण्य ऊस संशोधन संस्था आहे. गेल्या ११० वर्षांहून अधिक काळात या संस्थेने देशाला अनेक उच्च उत्पादक, दर्जेदार आणि रोगप्रतिकारक ऊस वाण दिले आहेत. आता उभारण्यात येणाऱ्या ऊस उत्कृष्टता केंद्रामुळे भारतीय ऊस शेती आणि साखर उद्योगाला जागतिक स्तरावरील संशोधनाचे नवे बळ मिळेल, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.






