Pune District : नीरा-भीमातून राज्याला आधुनिक ऊस शेतीचे मॉडेल : हर्षवर्धन पाटील
Pune District : प्रारंभी कर्मयोगी शंकरराव पाटील आणि लोकनेते शहाजीराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

इंदापूर : ऊस शेती अधिक शाश्वत, किफायतशीर आणि उत्पादनक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असून, निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राज्यासमोर आधुनिक ऊस शेतीचे आदर्श मॉडेल उभे केले जात आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होण्याबरोबरच पाणी, खत आणि उत्पादन खर्चात मोठी बचत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावर आयोजित ‘ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान’ विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. प्रारंभी कर्मयोगी शंकरराव पाटील आणि लोकनेते शहाजीराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांनी एआयमुळे जमिनीतील आर्द्रता, पिकाची गरज आणि खतांची कार्यक्षमता अचूक समजत असल्याने पाणीबचत आणि उत्पादनवाढ शक्य होत असल्याचे सांगितले. प्रमुख ऊस प्रजनन विभागाचे डॉ. के. व्ही. सुशिर यांनी व्ही.एस.आय.-२११२१ आणि व्ही.एस.आय.-२५१२१ या नव्या ऊस वाणांची माहिती देत ते लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
विज्ञान केंद्र, बारामतीचे कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग प्रमुख तुषार जाधव यांनी उपग्रह प्रणाली आणि सेन्सरच्या साहाय्याने शेतकऱ्यांना मोबाईलवर अचूक माहिती मिळत असल्याने पाणीबचत, पर्यावरण संवर्धन आणि उत्पादनवाढ या तिन्ही बाबींना चालना मिळत असल्याचे स्पष्ट केले. कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, संचालक, पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. आभार अॅड. अनिल पाटील यांनी मानले.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पाच स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार असून प्रारंभी १२५ ते १५० शेतकऱ्यांना या प्रकल्पात सहभागी करून घेतले जाणार आहे. मोबाईलवरून पाणी व्यवस्थापन, खतांचा वापर, रोगनियंत्रण आणि औषध फवारणीबाबत अचूक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने या योजनेसाठी अनुदान मिळणार असून उर्वरित खर्च कारखाना उचलणार आहे.
– हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री.
१६ बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविणार
ऊस शेतीसाठी वर्षभर पाण्याची उपलब्धता राहावी यासाठी निरा नदीवरील १३ आणि भीमा नदीवरील ३ अशा एकूण १६ बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविणे तसेच गळती रोखण्याची जबाबदारी निरा-भीमा सहकारी साखर कारखाना स्वीकारणार असल्याची घोषणा हर्षवर्धन पाटील यांनी केली.





