Harneshwar Temple: हरणेश्वरचा लोकसहभागातून कायापालट! जीर्णोद्धार अन् सुशोभिकरणासाठी दात्यांचा मोठा हातभार
Harneshwar Temple: पांडवकालीन तीन पाण्याच्या टाक्या अन् स्वयंभू शिव-पार्वती लिंग; श्रावणी सोमवारी पुणे, सातारा आणि बारामतीतील भाविकांची दर्शनासाठी रीघ.

Harneshwar Temple – हरणी (ता. पुरंदर) येथील डोंगरावरती पांडवकालीन स्वयंभू हरणेश्वर मंदिर असून स्वयंभू पिंडीवर शिव-पार्वती यांचे दोन लिंग आहेत. श्रावण महिन्यात स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. चैत्र महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरत आहे. परिसरातील कावडी येथे जलाभिषेक घालण्यासाठी येतात. यात्रा काळात रोज हरणी गावातील पाच मानाच्या कावडी नीरा नदीवरून पाणी आणून महादेवास जलाभिषेक घातला जातो.
हरणी महादेवाचा डोंगर अशी या डोंगराची ओळख आहे. वाल्हे, परिंचे, वीर, हरगुडे, पिंगोरी, मांडकी, जेऊर, दौंडज, पिसुर्टी, जेजुरी, सासवड, पुरंदर, बारामती, दौंड, पुणे, सातारा जिल्ह्यातील परिसरातील अनेक भाविक श्रावण महिन्यात या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. नवसाला पावणारा हरणेश्वर, अशी आख्यायिका आहे. कावडींना केलेले नवस फेडण्यासाठी एक महिना गावात पुरण पोळीचा महाप्रसाद असतो.
डोंगरावर खडकामध्ये खोदलेल्या तीन पाणी साठवण्याची टाकी आहे. पांडवांनी या टाक्याची निर्मिती केली असल्याची आख्यायिका सांगितली जाते. डोंगराच्या टोकावर हरणाई माता व कानिफनाथ (माईंब) अशी दोन मंदिरे आहेत. डोंगराच्या पायथ्याशी बळीचे मंदिर आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळात या डोंगराचा टेहळणी करण्यासाठी उपयोगी केला जात असल्याचे काही जुने लोक सांगतात. राजे उमाजी नाईक भूमिगत असताना काही काळ या डोंगरावर वास्तव केल्याचे सांगितले जाते.
पंधरा वर्षांपूर्वी डोंगरावर अनेक गोष्टींचा अभाव होता. ग्रामस्थांनी एकत्र येऊन काही शासकीय योजनांचा आधार घेत मंदिराचा जीर्णोद्धार व डोंगरावर सुविधा उपलब्ध केल्या आहेत. याकामी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आर्थिक हातभार लावला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार, परिसराला तटबंदी, घडीव दगडांचा पायरी मार्ग, वृक्षारोपण, रंगकाम, पिण्याच्या पाण्याची सोय, महादेव मंदिरापासून हरणाई माता मंदिरापर्यंत पायरी मार्ग आदी व्यवस्था केली आहे. डोंगरावर चार चाकी वाहन जाईल, यासाठी सिमेंट रस्ता तयार केला आहे.





