विविधा: हरिश्‍चंद्र बिराजदार

माधव विद्वांस

पै. सत्पाल यास हरविणारे, हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद असे किताब मिळविणारे कुस्तीगीर हरिश्‍चंद्र माधव बिराजदार यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्‍यात रामलिंग मुदगड या गावी 5 जून 1950 रोजी झाला. त्यांचे वडील माधवराव बिराजदारही नामांकित पहिलवान होते त्यामुळे कुस्तीचे बाळकडू घरातच मिळाले होते. त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांची आई निवर्तली त्यानंतर त्यांचे संगोपन वडिलांनीच केले. खेळण्यातले हरिश्‍चंद्रांच्या अंगचे गुण हेरून त्यांना 1965च्या सुमारास चांगला सराव करण्यासाठी कुस्तीची पंढरी कोल्हापूर येथील गंगावेस तालमीत पाठवायचे ठरविले. वर्ष 1966 त्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि ते कोल्हापुरात दाखल झाले.

अनेक पहिलवान शाकाहारी होते व सर्वच पहिलवानांना दिला जाणारा खुराकही शाकाहारीच असतो.पण लिंगायत असलेल्या हरिश्‍चंद्रांनी पूर्ण शाकाहारी राहून कुस्तीचा सराव केला आणि कुस्त्या जिंकूनही दाखविल्या. वस्तादांनी दीड वर्षांत शिकविलेल्या डावपेचांची शिदोरी घेऊन एक पैलवान म्हणून गावी परत आले. विद्यार्थी गटातून बुलढाणा येथे 1967 ला पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले व पैलवान हरी मामा मराठवाड्यातील पहिले महाराष्ट्र केसरी ठरले. कोल्हापूरच्या अनेक स्थानिक स्पर्धामधे यश मिळविले. कोल्हापूरला तालमी भरपूर व स्पर्धाही भरपूर आणि गुणी खेळाडूला प्रोत्साहन देण्याची कोल्हापूरकरांची खासियत त्यामुळे हरिश्‍चंद्राचा मल्लावतार कोल्हापूरच्या मातीत झाला असेच म्हणावे लागेल. त्यावेळी तालमीत गणपत खेडकर, दिनानाथसिंह, टोपाण्णा गोजगे हे गाजलेले मल्ल होते. तालमीतल्या एका खोलीत हरिश्‍चंद्रांनी आपली पेटी ठेवली. ही पेटी म्हणजे पैलवानांचा आधार बनली. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी सर्वांना आपलेसे करून घेतले होते. “मामा पैलवान’ नावानेच ते ओळखले जाऊ लागले. 1969 मध्ये दादू चौगुले याला हरवत त्यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्याच वर्षी कानपूर येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी हिंदकेसरी किताबही जिंकला.

स्कॉटलॅंडमधील एडिंबरा येथे झालेल्या 1970 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी कुस्तीतले सुवर्णपदक जिंकले. 1972 साली वाराणसी येथे झालेल्या भारतातल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी नेत्रपाल नावाच्या दिल्लीच्या कुस्तीगिराला हरवत “रुस्तम-ए-हिंद’ किताब पटकावला. 1977 साली बेळगाव येथे झालेल्या मैदानी कुस्तीच्या मुकाबल्यात त्यांनी दिल्लीच्या बिर्ला आखाड्याच्या सत्पाल मल्लास हरवण्याचे आव्हान जिंकले. कुस्तीमधून निवृत्ती घेतल्यावर बिराजदार हे पुण्यात गोकुळ वस्ताद तालीम येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. 1971 मध्ये त्यांना शिवछत्रपती पुरस्कार आणि त्यानंतर 1998 मध्ये कोचिंगसाठी दादोजी कोंडदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारने वर्ष 2006 मधे त्यांना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचे पुणे येथे 14 सप्टेंबर 2011 रोजी निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)