BBL 2025 : मैदानावर चुकला काळजाचा ठोका! रौफ-कार्टराइटचा भयानक अपघात थोडक्यात टळला, पाहा थरारक VIDEO

BBL 2025 Haris Rauf and Hilton Cartwright Video : ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय टी-२० स्पर्धा ‘बिग बॅश लीग’ (BBL) सध्या रोमांचक वळणावर आहे. मात्र, रविवारी २८ डिसेंबर रोजी मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर यांच्यातील १४ व्या सामन्यात एक असा प्रसंग घडला, ज्याने मैदानावरील खेळाडूंसह प्रेक्षकांच्याही काळजाचा ठोका चुकला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ आणि ऑस्ट्रेलियाचा हिल्टन कार्टराइट यांच्यात होणारी भीषण टक्कर थोडक्यात टळली आणि एक मोठा अपघात होता होता राहिला.
नेमकं काय घडलं?
सिडनी थंडरची फलंदाजी सुरू असताना डावातील शेवटचे षटक टॉम करन टाकत होता. चौथ्या चेंडूवर थंडरच्या फलंदाजाने हवेत उंच फटका मारला. चेंडू बॅकवर्ड पॉइंट आणि डीप पॉइंटच्या मध्ये पडणार होता. हा झेल टिपण्यासाठी पॉइंटला उभा असलेला हारिस रौफ धावत सुटला, तर दुसरीकडून बाउंड्रीवर तैनात असलेला हिल्टन कार्टराइटदेखील वेगाने चेंडूच्या दिशेने आला.
LOOK OUT 🫣
This could have been awful. #BBL15 pic.twitter.com/wJTnyNLSCm
— KFC Big Bash League (@BBL) December 28, 2025
दोन्ही खेळाडूंचे लक्ष केवळ चेंडूकडे होते आणि ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने वेगाने येत होते. ज्या क्षणी चेंडू खाली येणार होता, त्याच वेळी दोघांनीही झेल घेण्यासाठी डायव्ह मारली. मैदानावर उपस्थित सर्वांना वाटले की आता दोघांची जोरदार धडक होईल, ज्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकली असती.
हेही वाचा – ILT20 2025 : ३८ वर्षीय पोलार्ड तात्याचा रुद्रावतार! एकाच षटकात तब्बल ‘इतक्या’ धावांचा पाडला पाऊस, पाहा VIDEO
कार्टराइटची प्रसंगावधानता –
सुदैवाने, डायव्ह मारण्यापूर्वी शेवटच्या क्षणी कार्टराइटची नजर हारिस रौफवर पडली. त्याने प्रसंगावधान राखत स्वतःचा मार्ग बदलला आणि दुसरीकडे डायव्ह मारली. यामुळे दोघांची टक्कर टळली. जरी हा झेल कोणालाही घेता आला नाही, तरीही दोन्ही खेळाडू सुरक्षित राहिल्याने संघाने आणि चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हेही वाचा – VVS Laxman : ‘आम्ही लक्ष्मणशी बोललो…’, बीसीसीआयचा मोठा खुलासा; गौतम गंभीरच्या पदावर आली मोठी अपडेट
हारिस रौफची भेदक गोलंदाजी –
या घटनेव्यतिरिक्त हारिस रौफने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या भेदक माऱ्यासमोर सिडनी थंडरचा डाव १२८ धावांवर गडगडला. रौफने ३ विकेट्स घेतल्या, तर टॉम करन, मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू स्वेपसन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मेलबर्न स्टार्सने जो क्लार्कच्या नाबाद ६० आणि ग्लेन मॅक्सवेलच्या ३९ धावांच्या जोरावर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.





