Pune : लक्ष्मी रस्त्यावरचा आनंदी दिवस

पुणे : रस्त्यांवर रांगोळ्याच्या पायघड्या, आसपास खाण्याचे आणि खरेदीचे स्टाॅल आणि सोबत मनोरंजन तसेच प्रबोधनातून जनजागृती आणि पुणेकरांचा उत्साही सहभाग अशा वातावरणात लक्ष्मी रस्त्यावर आज पादचारी दिन साजरा करण्यात आला. त्यामुळे एरवी वाहनांच्या रांगा आणि हाॅर्नच्या आवाजाचा गोंगाळात तसेच पदपथांवरील अतिक्रमणांमुळे चालताही न येणाऱ्या लक्ष्मी रस्त्याने या निमित्त मोकळा श्वास घेतला. चालण्यास प्रोत्साहन देणे, खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करणे आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी विशेष कौतूक केले. एकच दिवस नाही तर प्रत्येक महिन्यात एक दिवस हा उपक्रम महापालिकेने राबवावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमात मोठा सहभाग घेतला.
लक्ष्मी रस्त्यावर दिवसभर असे उत्साही वातावरण होते. मात्र, सुट्टीचा दिवस नसल्याने तसेच शाळा असल्याने मागील काही वर्षांच्या तुलनेत सकाळी आणि दुपारी या उपक्रमात कमी गर्दी दिसून आली. मात्र, संध्याकाळ नंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. अनेक शाळांनी या ठिकाणी मुलांच्या सहली आणल्या होत्या. महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनीही या उपक्रमास भेट देत महापालिका अधिकाऱ्यांचे कौतूक केले.
पुणेकरांनी धरला ठेका…
यावेळी रस्ता फोर स्ट्रीट या बॅंड पथकाने लक्ष्मी रस्त्यावर मराठी आणि हिंदी गितांचे झेंबे आणि गिटारवर फ्यूजन सादर करीत पुणेकरांना अक्षरश: ठेका धरायला लावला. या शिवाय इतर काही वादकांनीही आपली कला सादर केली. लहान मुलांसाठी सापशिडी, ई- स्कूट राइड, सायकल ठेवण्यात आल्या होत्या. या खेळांतही उपस्थितांनी सहभाग घेतला तर पर्यावरण आणि वाहतूक नियमांची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी चांगली गर्दी केली होती.
मी ६७ सालापासून लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी येतो. मात्र, तेव्हाचा रस्ता आणि आताचा रस्ता खूप बदल झाला आहे. आता पथारी, वाहनांच्या गर्दीमुळे या रस्त्यावर चालणेही शक्य नाही. मात्र, हा उपक्रम चांगला आहे. पालिकेने या रस्त्यावर महिन्यातून एकदा हा उपक्रम राबवावा तसेच हा रस्ता अतिक्रमणमुक्त करावा .
– एक ज्येष्ठ दांपत्य
मी पहिल्यांदा या उपक्रमात सहभागी झालो आहे, छान उपक्रम आहे, मुलांसाठीचे उपक्रम विशेष कौतुकास्पद आहे. अतिक्रमणमुक्त रस्ता पाहताना खूप आनंद होतो, अशाच नियमित उपक्रमांची गरज आहे.
– प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ नागारिक
मी आजी-आजोबांसोबत या उपक्रमासाठी आले आहे. येथे खायला आणि खेळायला खूप मजा आली. सगळा रस्ता रिकामा होता. आमच्यासाठी ठेवलेले खेळ खूप आवडले.
– श्रुती जाधव




