Pimpri Chinchwad News : प्रभाग १६ मध्ये डासांचा सुळसुळाट; पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले
Pimpri Chinchwad News : आरोग्य विभागाला नगरसेविका रेश्मा कातळे यांचे लेखी निवेदन; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.

Pimpri Chinchwad News – प्रभाग क्रमांक १६ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धूर फवारणी (फॉगिंग) करण्यात आलेली नसल्यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगरसेविका सौ. रेश्मा बापुजी कातळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे लेखी निवेदन देत तातडीने फवारणी करण्याची मागणी केली आहे.
नगरसेविका कातळे यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य विभाग ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक १६ मधील विविध भागांमध्ये बराच काळ धूर फवारणी करण्यात आलेली नाही. परिणामी डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून डेंग्यू व इतर रोगांचा धोका वाढत आहे.
या संदर्भात संबंधित विभागाला वारंवार कळवूनही समाधानकारक कार्यवाही होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रभागातील सर्व भागांमध्ये त्वरित धूर फवारणी करून डास नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, प्रभागातील नागरिकांनीही वाढत्या डासांच्या त्रासाबाबत चिंता व्यक्त केली असून महानगरपालिकेने तातडीने फवारणी मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.





