Khatav News – वर्धनगड गावाला ऐतिहासिक वारसा असलेल्या हुतात्म्यांची भूमी, खटाव तालुक्याचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वर्धनगड गावातील मूलभूत सोयीसुविधांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, सध्या गावाला कचऱ्याच्या साम्राज्याने वेढले आहे. दलित वस्तीकडे जाणारे रस्ते, बंदिस्त गटारांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर रिपाइं (ए) चे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शिवशरण यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.प्रशांत शिवशरण यांनी सांगितले की, मातंग वस्तीपासून खाली जाणारे गटार रियाज शिकलगार आणि इलाही शिकलगार यांच्या घराजवळ येऊन उघडे सोडण्यात आले आहे. पूर्वी हे गटार एकाच ठिकाणी शोषखड्ड्याप्रमाणे एका जागेवर नियंत्रित होते. ते त्या ठिकाणावरून बंदिस्त केले. मात्र, आता ते या घरांपाशी उघडे केल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना श्वास घेणेही कठीण झाले असून, साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.कुंभार आळीकडून सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर परिस्थिती अत्यंत भयावह आहे. वर्धनी विद्यालयाकडे जाणाऱ्या तिखटण्याच्या परिसरात ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. कचऱ्याच्या या ढिगाऱ्यामुळे डांबरी रस्ता अरुंद झाला असून, येण्या-जाण्यासाठी जागा उरलेली नाही. कचऱ्याची ही समस्या केवळ एका भागापुरती मर्यादित नसून, मारुती मंदिरालगतच्या परिसरातही लोकांनी अस्वच्छता पसरवली आहे.गावाच्या चारी बाजूंनी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असताना ग्रामपंचायत मात्र सुस्त आहे. जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदून हा कचरा एकत्रित करून विल्हेवाट लावणे शक्य आहे. परंतु, वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीने आजवर कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. पाणी गळतीचा प्रश्न तर कायमचाच झाला आहे. केवळ कचराच नव्हे, तर ननवरे यांच्या घरासमोर आणि कुंभाराच्या दुकानासमोर असलेली पाइपलाइन गेल्या अनेक दिवसांपासून लिकेज आहे. यामुळे काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असून काही ठिकाणी रस्त्यावर तर प्रमुख चौकात गटार पाणी साठले आहे. जेसीबी लावून कचरा हटवावा गावातील ही परिस्थिती अत्यंत संतापजनक आहे. प्रत्येक भागवार घरासमोर कचरा साचणे आणि वस्तीमधील गटार उघडे ठेवणे मुख्य चौकातून गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहने हे प्रशासनाचे अपयश आहे. ग्रामपंचायतीने तात्काळ जेसीबी लावून कचरा हटवावा आणि गटारांचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा रिपाइं स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.”असा इशारा प्रशांत शिवशरण यांनी दिला आहे.