कैरो – गाझामध्ये इस्रायलबरोबर सुरू असलेला संघर्ष थांबवण्यास हमासने तयारी दर्शवली आहे. मात्र युद्धबंदीबाबत अमेरिकेने मांडलेल्या प्रस्तावाबाबत हमासने मौन बाळगले आहे. गाझामध्ये ६० दिवसांचा युद्धबंदी करार करण्यात यावा, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवले आहे. या ६० दिवसांच्या कालावधीमध्ये गाझामध्ये स्थायी युद्धबंदी घडवून आणण्यासाठीच्या वाटाघाटी करण्यात याव्यात आणि हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटकाही करता येऊ शकेल, असे ट्रम्प यांनी सुचवले होते. युद्धबंदी मान्य करावी, यासाठी अमेरिकेकडून इस्रायलवर मोठा दबाव आणला जात असून आता हा प्रस्ताव इस्रायलने मान्य केला असल्याचे देखील ट्रम्प यांनी म्हटले आहे. जर हमासने हा प्रस्ताव मान्य केला नाही, तर परिस्थिती अधिकच वाईट होईल, असेही ट्रम्प म्हणाले होते. हमासला गाझामधून पुर्णपणे हद्दपार करण्याची इस्रायलची मागणी आहे. मात्र त्यावर ट्रम्प यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस ग्वाही दिली गेलेली नाही. युद्ध समाप्त व्हावे यावर इस्रायल आणि हमासचे एकमत असले तरी युद्ध कसे संपवावे यावर इस्रायल आणि हमासमध्ये मतभेद आहेत. तर या स्थायी युद्धबंदी ऐवजी पुर्ण यद्धबंदी लागू करावी आणि इस्रायलच्या सर्व सैन्याने गाझामधून माघार घ्यावी, अशी हमासची मागणी होती. मात्र आता युद्धाचा पूर्णपणे अंत होईल अशा कोणत्याही पुढाकाराचा स्वीकार करण्यास हमास तयार असल्याचे हमासचे अधिकारी ताहेर अल-नुनू यांनी सांगितले. अमेरिकेच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हमासचे एक शिष्टमंडळ बुधवारी कैरोमध्ये इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांना भेटण्याची अपेक्षा आहे.