nagar | भंडारदरा धरणात अर्धा टीएमसी पाण्याची आवक

अकोले, (प्रतिनिधी)– अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रात व जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटघर, रतनवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. भंडारदरा धरणांत २४ तासात ४६३ दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने धरणाचा पाणीसाठा २७३१ दलघफू एवढा होऊन धरण २५ टक्के भरले आहे.
पाणलोट क्षेत्रातील नदी, ओढे, नालेसह नयनरम्य धबधबे ओसंडून वाहू लागल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. परिसरात निसर्गाने हिरवागार शालु परिधान केल्याने या क्षणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचा ओघ ही वाढला आहे.
काल दिवसभरात घाटघर येथे २३० मि.मी.एवढा तर रतनवाडी येथे २०५ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे. पांजरे १०१ मि.मी., भंडारदरा ३५ मि.मी.व निळवंडे २७ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे. या पावसाने भंडारदरा धरणात २४ तासांत ४६३ द.ल.घ.फु नवीन पाण्याची आवक झाली.
भंडारदरा धरणाचा पाणीसाठा २७३१ दलघफु एवढा होऊन भंडारदरा धरण २५ टक्के भरले आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील सुरू असलेल्या जोरदार पावसाने ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहे. नयनरम्य धबधबे उंचावरून कोसळू लागले आहे. परिसर हिरवेगार होऊन निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करत आहे.
पर्यटकांची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे. निसर्गाचे सुंदर रुप पाहण्यासाठी शनिवार,रविवार सुट्टीचे दिवस असल्याने पर्यटकांनी गर्दी झाली होती.सततच्या सुरू असलेल्या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण असून, भात रोपे बहरू लागली आहे. उघडीप मिळताच आदिवासी शेतकऱ्यांची भात आवणीला सुरूवात होणार असून, त्यादृष्टीने या भागातील शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.





