नेवासा – जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सततच्या पावसामुळे भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सायंकाळी ६ वाजताच्या नोंदीनुसार, भंडारदरा धरणातून १३,३४४ क्युसेक, तर निळवंडे धरणातून १५,३५७ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय, ओझर बंधाऱ्यावरून ६,३०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणक्षेत्रात पाऊस असाच कायम राहिल्यास विसर्गाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी नदीपात्रापासून लांब राहावे, वाहत्या पाण्यातून पूल ओलांडू नये आणि पूरप्रवण भागात गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. धोकादायक परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचेही निर्देश देण्यात आले आहेत.