पुणे | एच. व्ही. देसाई महाविद्यालयास बी प्लस प्लस श्रेणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – द पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे चौथे नॅक पुनर्मूल्यांकन नुकतेच यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, नॅककडून महाविद्यालयास बी प्लस प्लस श्रेणी प्राप्त झाली आहे.
तज्ज्ञ समितीने दि. १२ आणि १३ ऑगस्ट २०२४ या दोन दिवशी महाविद्यालयास भेट दिली होती. त्या वेळी महाविद्यालयाचे सर्वंकष मूल्यमापन करण्यात आले.
त्यामध्ये महाविद्यालयाने २.८६ सीजीपीएसह बी प्लस प्लस श्रेणी प्राप्त केली आहे. या यशाप्रीत्यर्थ द पूना गुजराती केळवणी मंडळातर्फे महाविद्यालयात नुकतेच कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
नॅक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत विशेष योगदान देणाऱ्या ५५ शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष राजेश शहा यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांना नॅक प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष जनक शहा, सचिव हेमंत मणियार, सहसचिव दिलीप जगड, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


