दि पूना गुजराती केळवणी मंडळाची शताब्दी वर्षातील निवडणूक बिनविरोध

Pune – दि पूना गुजराती केळवणी मंडळाची नियतकालिक निवडणूक शताब्दी महोत्सवात बिनविरोध पार पडल्याची माहिती संस्थेचे चेअरमन डॉ.राजेश शहा यांच्याकडून देण्यात आली. या निवडणुकीमध्ये २०२५-२०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी संस्थेचे प्रमुख म्हणून नितीनभाई देसाई तर किरीटभाई शहा आणि राजेंद्रभाई शहा हे विश्वस्त म्हणून निवडून आले. त्याचप्रमाणे २०२५-२०३१ या सहा वर्षांच्या कालावधीसाठी संस्थेचे कार्यकारिणी सभासद म्हणून जनकभाई शहा, हेमंतभाई मणियार, विनोदभाई देडिया, दिलीपभाई जगड, मोहनभाई गुजराती, ब्रजेशभाई शहा, निलेशभाई शहा, किरणभाई शहा, दिपेनभाई शहा व निकुंजभाई शहा हे दहा सभासद बिनविरोध निवडून आले.
शिक्षण हे केवळ ज्ञानदानच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचेही मुख्य साधन ठरेल, हा दृष्टीकोन ठेवून कार्य करणारी ही संस्था यंदाच्या वर्षात आपले गौरवशाली शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. पारंपरिक मूल्ये आणि अत्याधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधणारी संस्था म्हणून मंडळ आपल्या गुणवत्तेमुळे नावलौकिकास आले आहे. मंडळाने आपल्या आजवरच्या प्रवासात आर. सी. एम. गुजराती प्रशाला आवार, कसबा पेठ, हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय आवार, बुधवार पेठ आणि PGKM स्कूल आवार, कोंढवा अशा तीन ठिकाणी विविध शैक्षणिक केंद्रे उभारली आहेत. संस्थेने आपल्या या शैक्षणिक प्रवासात नुकतीच एक मोलाची भर घातली आहे.
प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व ते बदलत्या डिजिटल जगात स्पर्धाशील बनावेत, यासाठी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाने २०२५ पासून बी.एस्सी. सायबर सुरक्षा (B.Sc. Cyber Security) हा नवा अभ्यासक्रम सुरू केला आहे. आजच्या काळात आर्थिक व्यवहार, सोशल मीडिया व्यवहार व विविध डिजिटल प्रक्रिया वेगाने ‘ऑनलाइन’ होत असल्याने सायबर सुरक्षिततेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. हॅकिंग, फसवणूक, डेटाची चोरी अशा घटनांमुळे या क्षेत्रात कुशल तज्ज्ञांची मागणी लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.
नवयुगीन कौशल्यांच्या माध्यमातून रोजगाराभिमुखता वाढवण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या या अभ्यासक्रमामुळे, खासगी व शासकीय संस्था, आयटी कंपन्या, बँका, शिक्षण संस्था यांसारख्या विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध होणार आहेत. मंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची देखील स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, विशेषतः ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. माफक शुल्कात दर्जेदार मार्गदर्शन देणाऱ्या या केंद्रातून आजवर शेकडो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदांवर विराजमान झाले आहेत. मंडळामार्फत चालविल्या जाणाऱ्या सर्व संस्थांमध्ये मिळून सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

