Gym Safety Tips: ऑक्टोबर हिटमध्ये ‘जिम क्रेझ’ बेतेल जीवावर! पारा ३५च्या उंबरठ्यावर; ‘या’ चुकांमुळे थेट हॉस्पिटलची वेळ
Gym Safety Tips: व्यायाम करताना संयम आणि पुरेसे पाणी आवश्यक; त्रास जाणवल्यास वर्कआउट तात्काळ थांबवण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन.

Gym Safety Tips- शहरात ऑक्टोबर हिट सुरू होण्यापूर्वीच सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाचा पारा वेगाने वाढत आहे. सकाळपासूनच उष्णतेचा तडाखा जाणवतो. अशा परिस्थितीतही जिम आणि मैदानांवर तरुणांची गर्दी वाढली आहे. मात्र, या उत्साहात आरोग्याचा धोका वाढत असल्याची बाब समोर येत आहे. कडक उन्हात अतिव्यायाम केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
सध्या अनेक तरुण भरउन्हात धावण्याचा सराव करत आहेत. पोलीस आणि सैन्य भरतीची तयारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, दुपारच्या वेळेत व्यायाम केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. त्यामुळे चक्कर येणे, स्नायूंमध्ये पेटके येणे असे प्रकार वाढत आहेत. जिममध्येही अतिव्यायामाचे प्रमाण वाढले आहे. जलद परिणामासाठी काही जण तासन्तास व्यायाम करतात. योग्य विश्रांती घेतली जात नाही. यामुळे शरीरावर ताण वाढतो. उष्णतेमुळे हृदयावरही परिणाम होण्याची शक्यता असते.
सप्लिमेंट्सचा वापर ही आणखी एक चिंतेची बाब ठरत आहे. प्रोटीन पावडर आणि इतर पूरक पदार्थांचा अतिरेक केला जात आहे. उन्हाळ्यात यामुळे शरीरातील उष्णता वाढते. किडनी आणि लिव्हरवर दुष्परिणाम होण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्यायामासाठी योग्य वेळ निवडणे आवश्यक आहे. पहाटे किंवा सायंकाळची वेळ अधिक सुरक्षित मानली जाते. दिवसभरात पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
व्यायाम करताना मध्ये-मध्ये पाणी किंवा ओआरएस घ्यावे. हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा. “उन्हाळ्यात व्यायाम करताना संयम पाळणे गरजेचे आहे. शरीराचा संकेत ओळखा. त्रास जाणवल्यास तात्काळ थांबा,” असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. एकूणच, पिंपरी-चिंचवडमध्ये फिटनेसची जागरूकता वाढली असली तरी, कडक उन्हात बेफिकीर व्यायाम टाळणे अत्यावश्यक ठरत आहे. सुरक्षिततेसह व्यायाम केल्यासच आरोग्य टिकू शकते.





